गावातील युवकाशी बोलल्याचा राग मनात धरून बापाचे मुलीशी गैरवर्तन

नागपूर : १२ ऑक्टोबर – गावातील एका युवकासोबत बोलल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलीला धडा शिकविण्याच्या उद्देशाने नराधम बापाने पोटच्या मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना सोमवारी (११ ऑक्टोबर) उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध भादंविच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गजानन शेंडे (रा. खडसंगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) असे आरोपी पित्याचे नाव आहे.
बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना गत २८ ऑगस्टला तालुक्यातील वासी येथे घडली. बापाच्या कौर्यामुळे पीडित मुलीला पोटाखालील भागावर झालेल्या जखमांच्या वेदना असह्य होऊ लागल्याने आईने तिला उपचारासाठी चिमूर येथील शासकीय रुग्णालयात नेले होते. उपचार करणार्या डॉक्टरने जखमांबद्दलचे कारण विचारले असता मुलीने घडलेला प्रकार त्यांना सांगितला व सहा आठवड्यांपूर्वी बापाने केलेल्या कृत्याचे बिंग फुटले. खडसंगी येथील एका युवकासोबत बोलताना आरोपी गजानन याने मुलीला बघितले. त्याचा माथा ठणकला व राग अनावर झाला. ही घटना घडली तेव्हा मुलीची आई व भाऊ हे वासी (ता. भिवापूर) येथे मुलीच्या आजोबाकडे गेले होते. रागाच्या भरातच आरोपीसुद्धा मुलीला घेऊन गत २८ ऑगस्टला वासी येथे आला. या ठिकाणी त्याने पोरीचे हातपाय दोरीने बांधून तिला एका खोलीत बंद केले. कापसाचे बोळे पेट्रोलमध्ये भिजवून ते तिच्या शरीरावर मळले.
घटनेनंतर काही काळ मुलीला कोणताही त्रास जाणवला नाही. परंतु, काही दिवसांनंतर पेट्रोलने असर दाखवायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी पेट्रोल मळले होते, त्या ठिकाणी जखमा तयार होऊन मुलीला वेदना जाणवू लागल्या होत्या. मुलीच्या तोंडून बापाची वरील कौर्यकथा एकताच उपचार करणार्या डॉक्टरने लगेच चिमूर पोलिसांना याबाबत सूचना दिली. घटनास्थळ भिवापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्याने चिमूर पोलिसांनी भिवापूर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. रविवारी रात्री उशिरा पीडित मुलगी व तिची आई यांनी येथील ठाणेदार महेश भोरटेकर यांची भेट घेऊन पीता गजानन शेंडेविरुद्ध तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी पहाटे आरोपी गजानन शेंडेविरुद्ध भादंविच्या ३५४ (अ) (ब), ३२३, ५0६ व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. ठाणेदार भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात उमरेड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल खोब्रागडे पुढील तपास करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्याचे समजते.

Leave a Reply