८ तास चाललेल्या धाडीत काही फाईल्स ताब्यात घेऊन सीबीआय पथक रवाना

नागपूर : ११ ऑक्टोबर – भ्रष्टाचाराचे आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आज सीबीआयच्या पथकाने पुन्हा एकदा छापेमारी केली. तब्बल आठ तासानंतर सीबीआयचे अधिकारी कारवाई केल्यानंतर देशमुख यांच्या निवासस्थाना बाहेर पडले आहेत. कारवाई दरम्यान सीबीआयच्या पथकाला कोणते पुरावे मिळाले या बद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, काही फाईल्स सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सीबीआयने दुसऱ्यांदा कारवाई केली आहे.
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सीबीआयचे एक पथक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले होते. यामध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश होता, त्यानंतर काही वेळाने आणखी दोन अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. सुमारे आठ तास झालेल्या कारवाईत सीबीआयच्या पथकाने अनिल देशमुख यांच्या घरातील आणि कार्यालयातील प्रत्येक कागदपत्रांची तपासणी केली. त्यांच्या हाती नेमका कोणता पुरावा लागला याबाबत सीबीआयकडून खुलासा झालेला नाही.
सकाळी सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले यावेळी देशमुख कुटुंबातील कोणताही प्रमुख सदस्य घरात उपस्थित नव्हता. सीबीआयची कारवाई असल्यामुळे पोलिसांचाही तगडा बंदोबस्त त्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला होता. सुमारे आठ तासांनंतर सीबीआयच्या पथकाने चार वाजता कारवाई पूर्ण केली. घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत असल्याने सीबीआयचे अधिकारी पोलिसांच्या सुरक्षेत घराबाहेर पडले.

Leave a Reply