भाडेकरूंच्या जाचाला कंटाळून घरमालकाने केली आत्महत्या

नागपूर : ११ ऑक्टोबर – घराची खोली भाड्याने दिल्यानंतर भाडेकरूने घराचे भाडे दर महिन्याला देणे अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता या भाडेकरूंनी उलट घरमालकालाच त्रास देणे सुरू केले. त्यांना १0 लाखांची खंडणीही मागितली. वारंवार शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकीही देत होते. भाडेकरूंच्या या जाचाला कंटाळून अखेर घर मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका हद्दीतील कस्तुरबानगर येथील रहिवासी मुकेशकुमार श्रीचंद रिझवानी (वय ४६) यांनी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ५.३0 वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला. तपासात मुकेशकुमार हरिचंद्र रिझवानी यांनी आरोपी राजेश नामोमल सेतीया (वय ४५) याला घराच्या ग्राउंड फ्लोअरवरील मागच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. परंतु, तो नियमित घरभाडे देत नव्हता. एकदा घरभाडे मागण्यासाठी मुकेश रिझवानी हे राजेश सेतीयाकडे गेले असता आरोपी सेतीयाने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, १0 डिसेंबर २0१९ रोजी रिझवानी यांना त्यांच्या दुकानाचे मीटर जळाल्याचे दिसून आले. त्यावरून रिझवानी यांनी आरोपी आरोपीचा मोठा भाऊ मुलचंद नामोमल सेतीयाकडे त्याची तक्रार केली. यानंतर कधीही आरोपी राजेश सेतीयाला घर खाली करण्यास म्हटल्यास तो त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता. यासाठी आरोपीचा मोठा भाऊदेखील त्याला सहकार्य करत होता. आरोपी एवढय़ातच थांबले नाही तर त्यांनी सप्टेबर २0१९ मध्ये मुकेश रिझवाणी यांना घर खाली करण्याकरिता १0 लाख रुपयांची खंडणी मागितली. घर रिकामे झाल्यास कायमची किटकिट सुटेल म्हणून मुकेश रिझवानी यांनी सेतीयाला वेळोवेळी ६0 हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपी राजेश सेतीयाने त्यांना आणखी ४ लाख ५0 हजार रुपयांची मागणी केली. आरोपींनी मुकेश रिझवाणी यांना वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. याच त्रासापोटी रिझवानी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपला व्हिडीओ व्हायरल केला होता. याप्रकरणी फिर्यादी कपिश सुनील रिझवाणी (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply