तंदुरुस्त राहण्यासाठी खेळाडूंनी दैनंदिन व्यायामाकडे लक्ष द्यावे – जिल्हाधिकारी विमला आर.

नागपूर : ९ ऑक्टोबर – खेळामध्ये दैनंदिन सरावाला अतिशय महत्त्व आहे. त्यासोबतच तंदुरुस्त राहण्यासाठी खेळाडूंनी दैनंदिन व्यायामाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर. यांनी सांगितले.
‘आजादी का अमृत महोत्सव’निमित्त आज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्राच्यावतीने मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे खेळाडूंसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यामध्ये फिजिओथेरपी, खेळांमधील दुखापतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
खेळादरम्यान झालेल्या दुखापतींवर मात करण्यासाठी खेळाडूंनी फिजिओथेरपी तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात योग्य आणि दैनंदिन व्यायाम करणे गरजेचे असते. त्यामुळे कार्यशाळेमध्ये होणाऱ्या मार्गदर्शनाचा खेळाडूंना नक्कीच लाभ होईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.
जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर. यांच्या निर्देशानुसार ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत हॅन्डबॉल क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू, बॉक्सिंग, बॅडमिंटन खेळाडूंसह इतर मैदानी क्रीडा प्रकारातील खेळाडूंची नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ पथकामार्फत फिजिओथेरपी करण्यात आली. तसेच त्यांना खेळांमधील दुखापतीबाबतच्या व्यायामाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक शेखर पाटील, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. उमांजली दमके, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदय वीर यावेळी उपस्थित होते. संचालन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले, तर आभार तालुका क्रीडा अधिकारी पवन मेश्राम यांनी मानले.

Leave a Reply