मुख्यमंत्री म्हणून कमी आणि पक्षप्रमुखच म्हणून ते जास्त बोलतात – अतुल भातखळकर

मुंबई : ९ ऑक्टोबर – चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन राज्यात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळत आहे. चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज पार पडलाय या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. या सोहळ्यास नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. त्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
नारायण राणे यांना चिपी विमानतळाचं श्रेय प्रामुख्यानं द्यायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या कामाला गती आली आहे. पण मुख्यमंत्र्यांचा कोतेपणा कायम दिसत आलाय. देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटन सोहळ्याला बोलावण्यात आलं नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरवलं होतं. तिथेच यांचा कोतेपणा दिसून आला. विमान वर वर जाईल पण हे मात्र कायम खाली येत आहेत. मुख्यमंत्री कमी आणि पक्षप्रमुखच म्हणून ते जास्त बोलतात, असा टोला अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.
मुंबई ड्रग्स प्रकरणात भातखळकर यांनी नवाब मलिकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलंय. क्रुझवर 1 हजार लोक होते. जर नवाब मलिकांना असं वाटतंय की NCB काही पक्षपात करत आहे, तर राज्यातील गृहमंत्री काय करत आहेत. 48 तास उशीरा व्हिडीओ का दाखवला. नवाब मलिकांवरच गुन्हा दाखल करायला हवा. हे प्रकरण गृहमंत्र्यांच्या अखत्यारित आहे. तर मग बाकीचे काय करत आहेत. इथे सर्व मुख्यमंत्री आणि तीन टोळ्याचे सरदार आहेत. इथे कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. महापालिका निवडणुकीत स्वबळावर भगवा फडकावेल असा विश्वास आहे. जे जे प्रकल्प फडणवीसांनी मार्गी लावले त्या सगळ्यांचा बट्ट्याबोळ या घरबश्या मुख्यमंत्र्यांनी केला, असा घणाघात भातखळकरांनी केलाय.

Leave a Reply