कुणाच्या दबावाखाली कोणतीही कारवाई होणार नाही – योगी आदित्यनाथ

लखनऊ : ८ ऑक्टोबर – उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या घटनेनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि मुख्य आरोपी आशिष मिश्रा याच्या अटकेची मागणी जोर धरतेय. याच विषयावर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘कायदा हातात घेण्याची सूट कुणालाही नाही परंतु, कुणाच्या दबावाखाली कोणतीही कारवाई होणार नाही’ असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.

‘लखीमपूर खीरीची घटना अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. सरकार या प्रकरणाचा खोलवर तपास करेलच. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही. कायदा सगळ्यांना समान सुरक्षा प्रदान करण्याची हमी देतो. त्यामुळे कुणालाही कायदा आपल्या हातात घेण्याचा अधिकार नाही, मग तो कुणीही असो’ अशी पुश्तीही योगी आदित्यनाथ यांनी जोडली.

गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राच्या बचावाचा प्रयत्न होतोय का? या प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी पुरावा मागितलाय. ‘कोणत्याही व्हिडिओत हे स्पष्ट होत नाही. कुणाकडेही पुरावा असेल तर तो अपलोड करण्यासाठी आम्ही नंबरही जारी केला आहे. लवकरच सगळं स्पष्ट होईल. कुणावरही अन्याय होणार नाही’ असं त्यांनी म्हटलं.

माननीय सर्वोच्च न्यायालयानं व्यवस्था केलीय की अटकेपूर्वी तुमच्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध असावेत. केवळ कुणाच्याही आरोपावरून अनावश्यक कुणालाही अटक करू शकत नाही, असं म्हणतानाच ‘जर कुणी दोषी असेल तर त्याला सोडलं जाणार नाही, मग तो व्यक्ती कुणीही असो’ असं सांगण्यास मुख्यमंत्री योगी विसरले नाहीत.

‘आम्ही सगळ्या उत्तर प्रदेशात हेच केलंय. ज्यांच्या कुणाविरोधात कारवाई करण्यात आलीय, त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळले आहेत. तेव्हा आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास कोणतीही भीड बाळगली नाही. लखीमपूर खीरी घटनेतही सरकार हेच करतंय’, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.

Leave a Reply