आता हरियाणामध्येही लखीमपूर घटनेची पुनरावृत्ती

नवी दिल्ली : ७ ऑक्टोबर – उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भाजपा नेत्याच्या मुलाने गाडीचे चिरडल्याच्या आरोपांवरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच हरियाणामध्येही अशीच एक घटना घडलीय. हरियाणामदील अंबाला जिल्ह्यातील नारायणगडमध्ये गुरुवारी एका पुरस्कार सोहळ्यासाठी क्रीडामंत्री संदीप सिंह आणि कुरुक्षेत्रचे भाजपा खासदार नायब सैनी पोहचले होते. जेव्हा शेतकऱ्यांना यासंदर्भात समजलं तेव्हा ते या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी पोहोचले.
शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या आणि रस्ताही बंद केला. मात्र यावेळी सुरु असणाऱ्या आंदोलनामध्ये सैनी यांच्या ताफ्यातील एका गाडीने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकाला धडक दिल्याचा दावा केला जात आहे. या ठिकाणी आंदोलक जमा झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला. मात्र शेतकऱ्यांना गाडीने उडवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आता केला जातोय.
हरियाणा काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुनही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर निशाणा साधण्यात आलाय. कुरुक्षेत्रचे भाजपा खासदार नायब सैनी यांच्या ताफ्याने अंबालामधील नारायणगडमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी चढवली. अशा अमानवीय कृत्यासाठी जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. शेतकऱ्यांवरील अत्याचार हे सहन करण्याच्या पलीकडे गेले असून भाजपाला अहंकाराची नशा चढलीय, अशा शब्दात काँग्रेसने टीका केलीय.
वृत्तानुसार या शेतकऱ्याला किरकोळ जखम झाली असून त्याच्यावर उपचार करुन त्याला रुग्णालयामधून घरी पाठवण्यात आलं आहे. या शेतकऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे ते रस्त्याच्या बाजूला उभा असताना सैनी यांच्या ताफ्यातील एका गाडीने त्याला धडक दिली. शेतकरी घोषणाबाजी करु लागल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी कार्यक्रम स्थळावरुन काढता पाय घेतला. त्यावेळीच जाताना या गाडीने शेतकऱ्याला धडक दिल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये खासदाराच्या गाडीचं नुकसान केल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त ट्रेब्यून इंडियाने दिलंय.

Leave a Reply