युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिले पाहिजे – नाना पटोले

मुंबई : ५ ऑक्टोबर – ‘काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून देशाची लोकशाही व संविधान हे काँग्रेसच वाचवू शकते. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष संघटना बळकट झाली पाहिजे. राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे, यासाठी एनएसयुआयच्या युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिले पाहिजे’, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नाना पटोले मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, तरुण हे देशाचे भविष्य आहेत. आपला देश हा तरुणांची जास्त संख्या असलेला देश असून देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाची उद्याची ताकद आहात. सामान्य माणसातून नेतृत्व उदयाला आले पाहिजे, यासाठी एनएसयुआयनेही तालुका पातळीपर्यंत जाऊन विस्तार केला पाहिजे, जनसंपर्क वाढवला पाहिजे, एनएसयुआयच्याही बुथ कमिट्या बनवल्या पाहिजेत. तुमच्यातून पक्षाचे नेतृत्व पुढे आले पाहिजे त्यासाठी ताकदीने कामाला लागा. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख व एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते.
पारधी समाजाकडे पाहण्याचा पूर्वापार दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. या समाजावर गुन्हेगारी समाज असा शिक्का मारला गेला आहे ती ओळख बदलून त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा वंचित, शोषित समाज घटकांना न्याय देणारा पक्ष असून राज्यातील आदिवासी पारधी समाजाच्या शिक्षण, रोजगार, राहण्याची सोय अशा सर्वांगिण विकासासाठी कट्टीबद्ध आहे, असं पटोले म्हणाले.
आदिवासी पारधी महासंघाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण
टिळक भवन येथे आदिवासी पारधी महासंघाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले ,त्यावेळी पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इंग्रजांच्या काळापासून पारधी समाजाकडे एक गुन्हेगारी समाज म्हणून बघितले जात असे स्वातंत्र्यानंतर त्यात बदल होत आहे, पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेस सरकारने या समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. शासनाच्या योजनांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आजही या समाजाचे काही प्रश्न, समस्या आहेत त्या मार्गी लावणे गरजेचे आहे त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक आयोजित करुन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करु.

Leave a Reply