नरखेड वनपरिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळला

नागपूर : ५ ऑक्टोबर – नरखेड वनपरिक्षेत्र विभागाच्या बानोर क्षेत्रात बरडपवणी शिवारात काल रात्री ७ च्या सुमारास बरडपवनी ते बानोर रस्त्यालगत असलेल्या शेतात बिबट मृतावस्थेत आढळला. विशेष म्हणजे तो बिबट मुंडके नसलेल्या अवस्थेत दिसून आला. बिबटची शिकार केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेची माहिती देण्यात आली असता वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, त्या घटनेचा पंचनामा न करता त्या बिबटचा मृतदेह वन कर्मचार्यांनी वन विभागाच्या कार्यालयात आणला. विशेष म्हणजे या घटनेची माहिती वन विभागाच्या मोठय़ा अधिकार्याला देण्यात आली नव्हती. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली. मृत बिबट ९ महिन्यांचा असल्याचे वन विभागामार्फत सांगण्यात आले. मृत बिबटचे मुंडके घटनास्थळापासून १00 मीटर अंतरावर सापडले आहे. परिसरात बिबट असल्याबाबत वन विभागाच्या कर्मचार्यांना या भागातील नागरिकांनी सांगितले होते. परंतु, वनविभागामार्फत कसल्याही उपाय योजना करण्यात आल्या नसल्याची तक्रार त्या भागातील नागरिक व पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांनी केली आहे.
घटनास्थळी सोमवारी सकाळी आणखी बिबटचे ठसे दिसल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वन विभागामार्फत देण्यात आला आहे.

Leave a Reply