शासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याने अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे

नागपूर : ५ ऑक्टोबर – रात्री उशिरा शासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने आपला संप आज मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफी, विद्यावेतनातून होणारी टीडीएस कपात रद्द करासह इतर मागणीसाठी १ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी संप सुरू केला होता. या काळात शासकीय रुग्णालयात रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते.
निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या या राज्यव्यापी संपात नागपुरातील मेडिकल-मेयोतील सुमारे ८00 डॉक्टरांनीही सहभाग घेतला. यामुळे रुग्णसेवा चांगलीच प्रभावित झाली होती. आंदोलनकर्त्यांनी काल दुपारी ३ वाजतापासून अतिदक्षता विभागासह इतर निवडक अत्यवस्थ रुग्णांची सोय वगळून रुग्णालयांतील आकस्मिक अपघात विभागासह इतरही तपासणींची सोय बंद करण्याची घोषणा केली होती.
परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दुपारी मुंबईत मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू झाल्यावर ही सेवा कमी करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. आंदोलनामुळे ३0 सप्टेंबरला मेडिकलची बाह्यरुग्ण विभागातील २,३९७ एवढी असलेली रुग्णसंख्या ३ ऑक्टोबरला ९९२ एवढीच नोंदवली गेली. तर ३0 सप्टेंबरला मेडिकलला ११ मेजर शस्त्रक्रिया, ५२ मायनर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. ३ ऑक्टोबरला मेजर शस्त्रक्रिया ५, मायनर शस्त्रक्रिया १0 इतक्या झाल्या. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुंबईत मार्ड संघटनेच्या शासनासोबत विविध मागण्यांबाबत वाटाघाटी सुरू होत्या. रात्री सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यामुळे संप मागे घेण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply