पत्रकार नोकरीतून सेवानिवृत्त होतो, पत्रकारितेतून नाही – राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

नागपूर : ४ ऑक्टोबर – नागपूर श्रमिक पत्रकार संघात मी घडलो. माझ्या जडणघडणित अनेकांचे योगदान आहे. पत्रकारांच्या हिताचे अनेक लढे आपण लढलो. त्यात वेतनवाढी सोबतच हक्क व अधिकारांच्या लढ्याचा समावेश होता.त्या संघटनेतर्फे सत्कार केला गेला. त्याबाबत आनंद झाला असे उदगार राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काढले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या आमसभेत राहुल पांडे यांच्या सत्काराचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानुसार रविवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना पांडे पुढे म्हणाले, माझ्यासोबत सेवानिवृत झालेल्या चार पत्रकारांचाही सत्कार झाला. ते नोकरीतून सेवानिवृत्त झाले. पत्रकारितेतून नाही. आतापर्यंत साठविलल्या अवुभवाचा उर्वरित आयुष्यात ते आणखी चांगला उपयोग करतील. नवीन पत्रकारांना घडविण्यात योगदान देत राहतील. कालपर्यंत मी तुमच्या सोबत होतो. पुढेही तुमच्या सोबतच राहणार आहे. केवळ माझ्या जबाबदारीत फरक पडणार आहे. आता विविध विभागांकडून माहिती काढून देण्याचे काम करावे लागणार आहे. त्यांनी आपल्या मनोगतात पत्रकार संघातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वांच्यावतीने वरिष्ठ पत्रकार रमेश मारूळकर यांनी राहुल पांडे यांचा शाल-श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यावेळी मंचावर वरिष्ठ पत्रकार जोसेफ राव, विश्वास इंदूरकर, भूपेंद्र गणवीर, पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिरीष बोरकर, सरचिटणीस ब्रम्हा त्रिपाठी, कोषाध्यक्ष वर्षा पाटील हजर होत्या.
तसेच यंदा सेवानिवृत झालेल्या पत्रकारांचा राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यात अनिल हर्डीकर, राहुल अवसरे, राजेंद्र दिवे आणि विवेक पुराणभट यांचा समावेश होता.
अध्यक्ष शिरीष बोरकर आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, पत्रकार संघात सक्रीय असणारे अन्य क्षेत्रात गेलेले अनेक आहेत. त्यापैकी नोंद घेण्यासारखे संयुक्त राष्ट्र संघात निवड झालेले बलवंतसिंह आणि आता राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे आहेत.या पदाची नावे सर्वोच्च न्यायालयाचे पॅनेलकडून राज्य सरकारकडे येतात. त्यातून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेता या तिघांचे पॅनेल नाव अंतिम करते. पांडे यांचे नाव एकमताने ठरले. हे विशेष होय. या निवडीचा नागपूर श्रमिक पत्रकार संघाला अभिमान आहे.

Leave a Reply