लखीमपूर खेरी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात मृतांची संख्या ९ वर

लखनौ : ४ ऑक्टोबर – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. या हिंसाचारातील मृतांची संख्या नऊ झाली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांवर दोन कार घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन गाड्यांना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. नऊ मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर, चार जण कारमधील असून एक स्थानिक पत्रकार असल्याचं समोर आलंय. रमण कश्यप असं या पत्रकाराचं नाव आहे. तो रविवारी हिंसाचार झाल्यापासून बेपत्ता होता. त्याच्या मृतदेहाची ओळख कुटुंबीयांनी पटवली आहे.
हिंसाचारानंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी यांना मध्य रात्रीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद आणि आराधना मिश्रा यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अखिलेश यादव यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपा खासदार वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर हिंसाचारात कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. “अशा घटना दुर्दैवी आहेत. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल आणि या कृत्यात सहभागी असलेल्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल.” असं त्यांनी म्हटलंय. तसेच हिंसाचारानंतर तणाव निर्माण झाल्याने लखीमपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

Leave a Reply