पूरग्रस्तांना दसऱ्यापर्यंत मदत न दिल्यास एकही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टी

कोल्हापूर : २९ सप्टेंबर – ‘राज्यातील पूरग्रस्तांना दसऱ्यापर्यंत मदत न दिल्यास राज्यात कोणत्याही मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, ऊसाची एफआरपी एक रक्कमीच मिळाली पाहिजे यासाठी घटस्थापनेपासून राज्यभरात ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तीपिठाची’ या नावाने जागर यात्रा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत शेट्टी म्हणाले,‘ सध्या साखर उद्योगात फीलगुड वातावरण आहे. कारखानदारांनी साखरेला ३५०० रुपये दर मागितला असताना बाजारात त्यांची साखर ३८०० रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे कारखानदारांनी आता रडायचं काही कारण नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. त्याचे तुकडे करण्याचा डाव भाजपचाच आहे. भाजपने टास्क फोर्सच्या माध्यमातून हा डाव खेळला आहे. केंद्र, राज्य सरकार आणि साखर कारखानदारांचा हा डाव आम्ही हाणून पाडू असा इशारा देताना ते म्हणाले, केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने एफआरपीची तुकडे करण्यासंदर्भात देशातील सर्वच राज्याकडे प्रस्ताव मागितला होता. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने त्याचे तुकडे करण्यासाठी शिफारस केली आहे. म्हणजे तुकडे करण्याचा मूळ बाप हा भाजपच असल्याचे स्पष्ट होते. तरीही आमचा काही संबंध नसल्याचे नाटक या पक्षाचे नेते करत आहेत.’
ऊस उत्पादकांचा मेळावा घेऊन राज्य, केंद्र आणि साखर कारखानदारांच्या या धोरणाविरोधात जनजागृती करण्याचा निर्धार आम्ही केला असे सांगून शेट्टी म्हणाले, एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घटस्थापनेपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून जागर यात्रा काढण्यात येणार आहे. ‘जागर एफआरपी चा आराधना शक्तीपिठाची’ या नावाने ही यात्रा साखर पट्ट्यात काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात वाडी रत्नागिरी येथे जोतिबाच्या दर्शनाने होईल. त्यानंतर ही यात्रा कोल्हापूर, सांगली, तुळजापूर, पंढरपूर, अकोला, पैठण, परळी वैजनाथ, नाशिक मार्गे जेजुरीला पोहोचेल. तेथे त्याचा समारोप होईल.
येत्या १९ ऑक्टोबर रोजी स्वाभिमानीची जयसिंगपूर येथे विसावी ऊस परिषद घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ही परिषद होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, यासाठी कोणाची परवानगी मागत बसणार नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही, ती तातडीने द्यावी. दसऱ्यापर्यंत ही भरपाई मिळाली नाही तर मंत्र्यांसह राज्यात कुणालाही दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तो कसा कडवट करायचा हे आम्हाला चांगले माहीत आहे असा टोलाही त्यांनी यावेळी मारला. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, उपस्थित होते.

Leave a Reply