सोमय्यांनी चिथावणीखोर भाषण न करता संयमाने आपला दौरा पूर्ण करावा – हसन मुश्रीफ

कोल्हापूर : २७ सप्टेंबर – लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैया काहीही वक्तव्य करत आहेत. त्यांनी चिथावणीखोर भाषण न करता संयमाने आपला दौरा पूर्ण करावा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमैया यांना दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपचे नेते किरीट सोमैया हे मंगळवारी (दि. 28 सप्टेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. लक्ष वेधण्यासाठी सोमैया काहीही वक्तव्य करत आहेत. मात्र, त्यांनी चिथावणीखोर भाषण न करता आपला दौरा संयमाने पूर्ण करावा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमैया यांना दिला आहे. किरीट सोमैया यांनी कोल्हापुरात येऊन त्यांनी आमचे सामाजिक-राजकीय काम पाहावे. जिल्हा बँकेचे उल्लेखनीय काम आणि वाढता नावलौकिक कामाचा आढावा घ्यावा, असेही मुश्रीफ म्हणाले.
अकरा वर्षांपूर्वी कारखान्याची उभारणी झाली आहे. मात्र, एका कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक यांनी राजकीय विरोधकाबाबत योग्य टिप्पणी केली. जर मुश्रीफ यांनी घोटाळा केला असता तर आम्ही विरोधक म्हणून त्याच वेळी त्यांचे भांडाफोड केला असता. मात्र, किरीट सोमैया हे शिळ्या कढीला उत आणत आहेत, अशी भावना अनेकांची आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
किरीट सोमैया उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे मी आमच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Leave a Reply