पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान पुन्हा हिंसाचार, खासदारांवर तृणमूलने हल्ला घडवून आणल्याचा भाजपचा आरोप

भवानीपूर : २७ सप्टेंबर – आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत उरल्यानं ही निवडणूक हायप्रोफाईल ठरतेय. भाजपकडून या मतदारसंघात मुख्यमंत्री बॅनर्जी यांना टक्कर देण्यासाठी प्रियांका टिबरेवाल यांना पुढे करण्यात आलंय. आज (सोमवार) सायंकाळी ५.०० वाजता भवानीपूरमध्ये प्रचार संपुष्टात येणार आहे. मात्र, प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही भवानीपूरमध्ये हिंसाचार घडल्याचं समोर येतंय. या दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं समजतंय. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हत्यारंही बाहेर काढावी लागल्याचं समोर येतंय.
भवानीपूर मतदारसंघात प्रचारासाठी दाखल झालेल्या भाजप खासदार दिलीप घोष यांच्यावर तृणमूल काँग्रेसकडून हल्ला घडवून आणण्यात आल्याचा दावा भाजपनं केलंय.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांना टीएमसी कार्यकर्त्यांनी चारही बाजुंनी घरले. यावेळी घोष यांना धक्काबुक्की करण्यात आली. घोष यांच्यासोबत खासदार अर्जुन सिंह हेदेखील घटनास्थळी उपस्थित होते. तृणमूल कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांचा पाठलाग केला, असं भाजपचं म्हणणं आहे.
या दरम्यान परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, सुरक्षा रक्षकांनी दोन्ही नेत्यांना सुरक्षितरित्या घटनास्थळावरून हलवलं.
दरम्यान, भवानीपूर मतदारसंघात ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, नागरिकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, धास्तीनं त्यांनी मतदानासाठी घराबाहेरच पडू नये, अशी ममता बॅनर्जी यांची इच्छा आहे, असे आरोप खासदार अर्जुन सिंह यांनी मीडियाशी बोलताना केले.

विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदार संघात भाजप उमेदवारी सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं विधिमंडळ सदस्य होण्यासाठी ममता यांना भवानीपूर मतदारसंघात विजय मिळवणं अपरिहार्य आहे.

Leave a Reply