अमरावती : २७ सप्टेंबर – पर्यटन नगरी चिखलदरा येथे दुपारी ३ वाजता वीज कोसळून अमरावतीचे ६ पर्यटक जखमी झाले. यातील तिघांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर माहितीनुसार, चिखलदर्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मोझरी पाईंटवर पाऊस सुरू नसताना अचानक दुपारी ३ च्या सुमारास वीज कोसळली. यावेळी त्या ठिकाणी अमरावतीच्या साबळे परिवारातील लोक उपस्थित होते. यामध्ये अमरावतीचे ५५ वर्षीय किशोर मोतीराम साबळे, २६ वर्षीय वैशाली किशोर साबळे, १३ वर्षीय आदित्य राजेश जवंजाळ, ३० वर्षीय सागर ठाकूर, ५० वर्षीय डॉ. ब्राम्हणे जखमी झाले. यातील साबळे कुटुंबातील तिघे गंभीर असल्याचे सांगितल्या जात आहे.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. सुदैवाने या अपघातात सध्या तरी कोणतीही प्राणहानी झालेली नाही. पावसाळ्याच्या दिवसांत डोंगराळ भागात अनेकदा वीज पडण्याचे प्रकार घडत असतात. यामध्ये अनेकांना प्राण सुद्धा गमवावे लागतात. मात्र, यातील अधिकाधिक घटना आतापर्यंत जंगलातच घडलेल्या आहेत. पर्यटनस्थळी वीज कोसळण्याची ही पहिलीच घटना असावी.