सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत घुसले मालवाहू वाहन, ३ गंभीर जखमी

बुलडाणा : २६ सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या बुलडाणा जिल्ह्याचा दौरा केला. मात्र यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या.
सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील नांद्री फाट्यावर ही घटना घडली. शनिवारी रात्री साडेआठ वाजता सुप्रिया सुळे शेगावकडे जात असताना ही प्रकार घडला आहे. यात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशा सूचना केल्या. तर माँ जिजाऊच्या राजवाडा येथे जाऊन राजवाड्याची पाहणी केली. त्यानंतर लवकरच अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून सिंदखेड राजा विकासा संदर्भात बैठक लावण्यात येईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं आहे. माँ जिजाऊच्या सिंदखेड राजा येथे राजवाडयाची पाहणी करत पर्यावरण स्थळासाठी बैठक लावणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सिंदखेड राजा येथील जिजाऊंचे स्मारक हे राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे वैभव आहे. त्याचं जतन होणे गरजेचं आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन या वास्तूंचे जतन करण्यासाठी योग्य ती पावले उचलायला पाहिजेत असं म्हणत तेथे सर्व सुविधा पुरवायला पाहिजेत, यासाठी आम्ही सर्व जण मिळून प्रयत्न करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

Leave a Reply