सागवान तस्करी करणाऱ्या वाहनासह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : २६ सप्टेंबर – वनोपजाची अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आलेल्या वाहनासह सागवान पाट्या जप्त करण्यात आल्याची कार्यवाही सकाळी 8 वाजता चिंतलपल्ली येथील वनउपज तपासणी नाक्यावर करण्यात आली. यावेळी १ लाख ४० हजार १०७ रुपयांचे सागवान व ३ लाख रुपयांचे वाहन असा एकूण ४ लाख ४० हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वनरक्षक एम. जे. धुर्वे हे चिंतलपल्ली येथील वनउपज तपासणी नाक्यावर अवागमन करणार्या वाहनांची तपासणी करीत असताना ए. पी. १५/टी. ए. ०३१४ या वाहनामध्ये टमाटरच्या ट्रेखाली वनउपज दडवून ठेवल्याचे आढळुन आले. याबाबत वाहतुक परवानगीची विचारणा केली असता वाहनावरील इतर व्यक्ती पसार झाले. त्यानंतर वाहनचालकास ताब्यात घेवून विचारणा केली असता सदर वनोपज अवैध वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर वाहन जप्त करुन येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले.
वाहनात सिलपाट २२ नग व पाट्या ३२ नग असे एकुण ५४ नग आढळून आले. याची किंमत बाजारभावानुसार १ लाख ४० हजार १०७ रुपये आहे. वाहन चालक सारय्या नारायण नलबुग्गा (२७) रा. आसरअल्ली यास ताब्यात घेवून वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे. सदर कार्यवाही सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार व सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) एस. जी. बडेकर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू यांनी केली.

Leave a Reply