विद्यार्थी नेता कन्हैया कुमार २८ सप्टेंबर रोजी करणार काँग्रेस पक्षात प्रवेश

नवी दिल्ली : २५ सप्टेंबर – जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार २८ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात सामील होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे त्याने पक्षात प्रवेश केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आता ह्या अफवांना पूर्णविराम लागला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) चा सदस्य असलेला कन्हैया कुमार हा त्याच्या भडक भाषणांसाठी, विशेषत: जेएनयूच्या दिवसातील भाषणांसाठी ओळखला जातो. त्याने बेगूसराय मतदारसंघातून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांच्या विरोधात उभा राहिला.
कन्हैया कुमार निवडणुकीत गिरीराज सिंह यांच्याकडून पराभूत झाला आणि आता पुढील बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात सामील होणार आहे. इंडिया टुडेने याविषयीचे सविस्तर वृत्त दिलं आहे.
बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने खराब कामगिरी केली होती, जे आरजेडी आणि जेडीयूच्या नेतृत्वाखालील युतींमध्ये जोरदार लढले गेले होते. काँग्रेस लढलेल्या ७० पैकी फक्त १९ जागा जिंकू शकली तर राजदने लढलेल्या १४४ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या.

Leave a Reply