पुणे : २५ सप्टेंबर – आघाडी सरकारकडून मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने खासदार संभाजी छत्रपती वैतागले आहेत. संभाजी छत्रपती यांनी पहिल्यांदाच ठाकरे सरकारला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांच्या या आक्रमक पवित्र्यावर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खासदार संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला आहे. राज्य सरकारने मला उपोषणाला मागे पडायला भाग पाडू नये. तात्काळ मराठा आंदोलकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा मी आझाद मैदानावर उपोषणाला बसायला केव्हाही तयार आहे, अशा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या सुरू असलेल्या घोळावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आरोग्य परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की या सरकारवर येते याचाच अर्थ भरती प्रक्रिया राबवताना गोंधळ झालाय हे उघड आहे. मात्र, आता यापुढे तरी असे प्रकार टाळले गेले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, २ सप्टेंबर रोजी संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटलं होतं. यावेळी या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन देण्यात आलं. या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही आहे. पण भाजपच्या प्रतिनिधींनी या निवदेनावर सही करणं टाळलं असल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात एकी नसल्याचं दिसून आलं होतं.
राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही सविस्तरपणे आमची बाजू मांडली. राष्ट्रपतींनी सर्व पार्श्वभूमी ऐकून घेतली आहे. तसंच राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली. तसंच मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आहे. आता मला या विषयी अभ्यासासाठी थोडा वेळ द्या, असं राष्ट्रपतींनी सांगितल्याचं संभाजीराजे म्हणाले होते.