मुंबई व मुलुंड पोलिसांनी येत्या २४ तासांत माफी मागावी – किरीट सोमय्या यांची मागणी

मुंबई : २२ सप्टेंबर – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आणल्याप्रकरणी सोमय्यांनी मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार केली आहे. आज मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात सोमय्यांनी तक्रार दाखल केली असून मुंबई व मुलुंड पोलिसांनी येत्या २४ तासांत माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरून रविवारी मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत राजकीय नाट्य घडले होते. सोमय्या यांना मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकावर रोखण्याचा मुंबई पोलिसांनी प्रयत्न केला होता. तसंच, कोल्हापूरला जाण्याआधीच सोमय्यांना कराड येथे पोलिसांनी उतरण्यास सांगितले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आलं. कायदेशीर नोटीस दिल्यावर जाऊ दिलं आणि त्यानंतर सीएसएमटीबाहेर मी जाऊन नये यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडागिरी केली. त्यामुळं अधिकृत तक्रार करण्यासाठी मी आलो आहे, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.
तसंच, मी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि एसपींना पुन्हा पत्र लिहलं आहे. २० तारखेचा स्थगित झालेल्या दौऱ्यासाठी पुढील मंगळवार व बुधवारी कोल्हापूरला जाणार आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता आंबाबाईचं दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करेन, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे. तसंच, उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशाप्रकारे लोकशाही चालवणार आहेत का? किरीट सोमय्याला एवढे का घाबरतात? उद्या उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पाहण्यासाठी गेल्यानंतर हे काय करणार?, असा सवाल सोमय्यांनी केला आहे.

Leave a Reply