उमा भरती यांचे नोकरशाही संबंधात वादग्रस्त वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : २२ सप्टेंबर – भाजप नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती नोकरशाही संबंधात एक वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आल्या आहेत. उमा भारतींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ‘तुमचा गैरसमज आहे… नोकरशाही काहीही नसते, केवळ आमच्या चपला उचलण्याचं काम करते’ असं वक्तव्य करताना या व्हिडिओत उमा भारती दिसून येत आहेत.
हा व्हिडिओ गेल्या शनिवारचा आहे. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अशा भाषेचा वापर आक्षेपार्ह आहे, उमा भारतींनी माफी मागत आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय.
‘तुम्हाला काय वाटतं नोकरशहा नेत्यांना गुंडाळतात…तर ते तसं नसतं, पहिल्यांदा खासगीत चर्चा होते आणि नंतर नोकरशहा त्याच्या फायली बनवतात’, असंही वक्तव्य उमा भारती यांनी केलंय.
११ वर्ष मी केंद्रात मंत्री राहिले, मध्य प्रदेशची मुख्यमंत्री पदावरही होते. अगोदर आमच्याशी चर्चा होते त्यानंतर फायली तयार होतात. नोकरशाह नेत्यांना गुंडाळू शकत नाहीत. त्यांची काय लायकी आहे? आम्ही त्यांना पगार देतो, पोस्टिंग देतो, प्रमोशन आणि डिमोशन देतो… त्यांची काहीही लायकी नाही. खरी गोष्ट तर अशी आहे की नोकरशहांच्या माध्यमातून आम्ही आमचं राजकारण साध्य करतो, असंही उमा भारती यांनी म्हटलं.
भोपाळ स्थित आपल्या निवासस्थानी ओबीसी महासभेच्या प्रतिनिधिमंडळाशी चर्चेदरम्यान, जाती आधारीत जनगणना तसंच लिंगायत समाजाविषयी बोलताना उमा भारतींनी कंपन्यांच्या खासगीकरणाविषयी आपला राग व्यक्त केला.
१८ सप्टेंबर रोजी ओबीसी महासभेच्या प्रतिनिधिमंडळानं माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांची भेट घेतली. या दरम्यान प्रतिनिधिमंडळानं ओबीसी जाती आधारीत जनगणना आणि खासगी सेक्टरमध्ये आरक्षणासंबंधी उमा भारतींकडे पाच सूत्रीय मागण्याचा एक अर्ज सोपवला. मध्य प्रदेश सरकारनं ओबीसी महासभेच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर ओबीसी महासभेकडून भाजपच्या खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा जोरदार विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply