भारतीय संस्कृती, मूल्ये आणि परिवार पद्धतीला जगात प्रचंड मान्यता – नितीन गडकरी

नागपूर : २२ सप्टेंबर – भारतीय इतिहास, संस्कृती, मूल्ये, परिवार पद्धतीला जगात प्रचंड मान्यता मिळाली आहे. भारतीय संस्कृतीसोबतच खऱ्या अर्थाने अध्यात्म, धर्म याबद्दलचे ज्ञानही जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे काम श्रद्धेय श्री श्री रविशंकर यांनी केले असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
प्रियदर्शनी अँकेडमीच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या आभासी कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, श्री श्री रविशंकर, संस्थेचे नानीक रुपाणी, सुरेश प्रभू, निरंजन हिरानंदाणी, डॉ. माशेलकर उपस्थित होते. ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील तसेच देश आणि विदेशातील उल्लेखनीय काम करणार्यांचा अँकेडमीतर्फे सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधकामाच्या वेळी अनेक अडचणी असताना नानीक रुपाणी व नाना चुडासामा यांचे बहुमोल सहकार्य मिळाल्याचा उल्लेख यावेळी केला. जागतिक दर्जाचे व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या प्रतिभावंतांना सकारात्मकतेने, गुणात्मकतेने एकत्र आणून समाजाची एकता मजबूत करून या सर्वांना भारतीय विचारधारेशी जोडण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून नानीक रूपाणी करीत असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.
भारतीय संस्कृती, इतिहास, परंपरा, मूल्ये, समाजपद्धती, अध्यात्म व धर्म जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे काम श्री श्री रविशंकर व रूपाणी सारख्या समाजातील मान्यवरांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगदिन साजरा केला. याची दखल घेऊन युनोनेही योगदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज जागतिक स्तरावर आमचा योगदिन साजरा केला जातो. याला आता जगात मान्यता मिळाली आहे. प्रियदर्शनी अॅकेडमीने केलेले हे सन्मान समाजातील अनेकांना प्रेरणादायी ठरतील, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply