किरीट सोमय्या यांच्याविरोधात अनिल परब यांचा १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

मुंबई : २१ सप्टेंबर – भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणणाऱ्या किरीट सोमैया यांच्या विरोधात शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे. ७२ तासांत सोमैया यांनी माफी मागण्याचा अल्टीमेंटम परब यांनी दिला होता. सोमैया यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने न्यायालयात धाव घेतल्याची माहिती परब यांनी ट्विट करून दिली आहे.
किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी मंत्री परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी १४ सप्टेंबर रोजी सोमैया यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते. तसेच ७२ तासांत माफी न मागितल्यास सोमैयांविरोधात १०० कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे परब यांनी म्हटले होते. अनिल परब यांच्या दाव्याला सोमैयै यांनी प्रतिउत्तर देताना, आपण अशा दाव्यांना भीक घालत नाही. आता शिवसेनेला असे वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात. आता विदर्भातील काँग्रेसचे मंत्री टार्गेटवर असल्याचा इशारा सोमैया यांनी दिला होता.
परब अब्रुनुकसानीच्या दाव्यावर ठाम होते. त्यामुळे ७२ तासाचा अवधी उलटून गेल्यानंतर अनिल परब यांनी १०० कोटींचा दावा ठोकला आहे. ट्विट करून या संदर्भातील माहिती परब यांनी दिली. ते म्हणाले की, किरीट सोमैया यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमैया यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Leave a Reply