पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता

नागपूर : २१ सप्टेंबर – पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीची विद्यमान सत्र न्यायाधीश नागपूर श्रीमती व्ही डी इंगळे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी राकेश दुर्वास गजभिये रा.समतानगर नागपूर याच्यावर त्याची पत्नी नामे पौर्णिमा राकेश गजभिये हिच्या खुनाचा गुन्हा दाखल होता.
सविस्तर माहिती अशी, सरकार पक्षानुसार आरोपीचा राकेश याचा २०१५ साली पौर्णिमा हिच्याशी प्रेमविवाह तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध झाला होता. लग्नाच्या काही दिवसानानंतर त्यांना एक मुलगाही झाला. दरम्यान पौर्णिमा ही मधुन मधुन घरुन कुणालाही न सांगता पडुन जायची,त्यामुळे आरोपी राकेश तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दि.२४/५/२०१७ रोजी पौर्णिमा कुणालाच न सांगता निघून गेली.आरोपीने त्याबद्दल रीतसर जरीपटका पोलीस स्टेशन येथे पोलीस तक्रारही दाखल केली होती.
दि.३१/५/२०१७ रोजी आरोपी राकेश चे घरमालक सकाळी ९ वाजता त्यांचे पत्नीसह सहज राकेशच्या घरी आले असता त्यांच्या पत्नीला पौर्णिमा ही मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिने आरडा ओरड केल्यावर शेजारी लोक जमले.त्यावेळी आरोपी राकेश हजर नसल्याने त्याचेवर संशय बळावला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली.
आरोपी राकेश विरुद्ध कलम ३०२ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करून तत्कालीन पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी तपास सुरु केला.
तपासादरम्यान आरोपीस सावनेर येथून अटक करण्यात आली तसेच गुन्ह्यात वापरलेला लोखंडी राॅड त्याचेकडून जप्त करण्यात आला.
याप्रकरणात सरकारकडून मृतकाच्या वडिलांसह एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा आणि वडिलांच्या साक्षीच्या आधारावर आरोपीला शिक्षा द्यावी असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला.
सरकारपक्षाचे आरोप फेटाळून लावत आरोपीतर्फे ॲड.चंद्रशेखर जलतारे यांनी न्यायालयास सांगितले की सरकारकडून सादर झालेला पुरावा हा त्रोटक आणि अविश्वसनीय आहे. आरोपी त्या रात्री घरी होता याचा पुरावा नाही. वास्तविक तो पत्नीच्या शोधार्थ सावनेरला गेला होता. मृतकाच्या सवयी लक्षात घेता तिला तिच्या एखाद्या संबंधिताने अथवा खुद्द तिच्या वडिलांनी मारल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीसांनी घटनास्थळी ठसेतज्ञास बदलावयास हवे होते. पोलीसांनी सखोल तपास न करता केवळ संशयावरून अटक करून न्यायालयात खोटे दोषारोपपत्र दाखल केले.
दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीचे म्हणणे ग्राह्य ठरवीत न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
सरकारकडून प्रमुख सरकारी वकील ॲड.आर.बी. भोयर यांनी युक्तिवाद केला.आरोपीतर्फे युक्तिवाद ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.

Leave a Reply