हुंड्याच्या मागणीवरून लग्न मोडणाऱ्या अभियंता व त्याच्या परिवाराविरोधात गुन्हा दाखल

भंडारा : २१ सप्टेंबर – लग्नाला आठ दिवस बाकी असताना दोन तोळे सोने आणि गाडीचा जाण्या-येण्याच्या खर्चाची मागणी करणाऱ्या व अपेक्षा पूर्ण न केल्याने विवाहाच्या दिवशी लग्नासाठी उपस्थित न राहिलेल्या अभियंता असलेल्या वराच्या विरोधात लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वधु पित्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरण कंपनीत अभियंता असलेल्या राजेंद्र शिंदे यांचा लाखनी येथील एका कुटुंबातील मुलीशी रितीरिवाजानुसार विवाह निश्चित करण्यात झाला. १५ ऑगस्ट रोजी साखरपुडा झाला. वर आणि वधू पक्षाकडील मंडळींच्या संमतीने १६ सप्टेंबर रोजी विवाहाचा मुहूर्त काढण्यात आला. महिनाभराचा कालावधी शिल्लक असल्यामुळे वधू पक्षाकडील मंडळींनी मंगल कार्यालय बुक करणे, कापड, दागदागिने खरेदी करणे, आवश्यक सामानाची जुळवाजुळव करणे सुरू केले. प्रतिष्ठेप्रमाणे विवाह समारंभाची तयारी सुरू असताना ८ सप्टेंबर रोजी वराचा वधूपित्याकडे निरोप आला. त्यात २ तोळे सोन्याचा गोफ आणि वर्धा ते लाखनी प्रवासासाठी २ ट्रॅव्हल्स गाड्यांचा जाण्या येण्याच्या खर्च हुंडा स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली. वधूपित्याने हुंड्याची मागणी अमान्य केल्यामुळे लग्नाच्या दिवशी वरात आलीच नाही. त्यामुळे विवाह समारंभ झाला नाही.
हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या वरास अद्दल घडावी म्हणून वधू पित्याने लाखनी पोलिस ठाणे गाठले व हुंडा मागितल्याची तक्रार दाखल केली. हुंडा मागणे आणि देणे कायद्याने गुन्हा असल्यामुळे लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २११/२०२१ हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ चे कलम ३ , ४ भादवी अन्वये राजेंद्र वामनराव शिंदे रा. केळकर वाडी वर्धा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ठाणेदार मनोज वाढीवे यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक गौरी उईके तपास करीत आहे.

Leave a Reply