राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत हिंगोलीच्या जागेवर भाजपकडून संजय उपाध्याय

पुणे : २० सप्टेंबर – काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव (हिंगोली) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी चार ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून संजय उपाध्याय ही जागा लढवणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह पाच राज्यात रिक्त झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या पोटनिवडणुकीसाठी १५ सप्टेंबरला अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारांना २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. चार ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. काँग्रेसकडून राज्यसभेसाठी राजीव सातव यांच्या पत्नी डॉ प्रज्ञा सातव यांचं नाव चर्चेत असताना भाजपनं उमेदवाराची घोषणादेखील केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत घेत संजय उपाध्याय यांचे नाव जाहीर केलं आहे. संजय उपाध्याय हे मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. येत्या २२ सप्टेंबरला ११ वाजता ते फॉर्म भरणार असल्याची घोषणा भाजपनं केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव एप्रिल २०२० मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. मात्र, याच वर्षी १६ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची राज्यसभेची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपणार होती. आता पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला जवळपास पाच वर्षे मिळणार आहेत. आघाडीत ही जागा काँग्रेसकडून लढवली जाणार आहे.

Leave a Reply