सांगली : २० सप्टेंबर –राज्यात कुठेही फिरण्याचा सर्वांना अधिकार असताना पोलिसांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांची अडवणूक केली जात आहे. जबरदस्तीने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतो. यावरून हे सरकार गुंडांची टोळी म्हणून राज्यात चालवले जाते की काय? असा प्रश्न पडतो. सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी राज्य सरकार बरखास्त होईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. कोल्हापूरला निघालेले किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्येच अडवल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार खोत बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले होते. कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात आली. महाविकास आघाडी सरकार हे राज्य गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय? महाविकास आघाडी सरकारने लक्षात घ्यावे की, उद्या किरीट सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला तर त्याच क्षणी महाराष्ट्र सरकार बरखास्त होईल. कोल्हापुरात गेल्यास सोमय्या यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिस अधिकारी देतात. याचा अर्थ या सरकारचे गुंडांना पाठबळ आहे काय? राष्ट्रवादीच्या गुंडांमध्ये एवढी तालिबानी वृत्ती आली कुठून?’ असे सवाल आमदार खोत यांनी उपस्थित केले आहेत.
महाविकास आघाडी सरकार जर दादागिरी करणार असेल तर, आम्हीदेखील त्यांना दादागिरीने उत्तर देऊ. किरीट सोमय्या हे एकटे नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी आहे, हे महाविकास आघाडी सरकारने लक्षात ठेवावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महा विकास आघाडी सरकारला आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.