कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहत नाही – प्रवीण दरेकर

मुंबई : १९ सप्टेंबर – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली आहे. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच सोमय्या यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण घडामोडीनंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमय्या यांना आलेल्या नोटिशीचा निषेध केला आहे. तसेच कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहत नाही असं म्हणत राज्य सरकारचे कान टोचले आहेत.
“किरीट सोमय्या यांच्यावर स्थानबद्ध करण्याची कारवाई केली जात आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. सोमय्या हसन मुश्रीफ यांचा दुसरा कथित घोटाळा बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरला जात आहेत. मात्र त्या ठिकणी कलम 144 लावून सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. खरं तर ते देवदर्शन घेऊन कोल्हापूरला जाणार होते. परंतु अशा प्रकारची मुस्कटदाबी सरकारने करायला नको होती,” असं दरेकर म्हणाले.
तसेच पुढे बोलताना सरकारचे तीस ते चाळीस पोलीस सोमय्या यांच्या मुलुंड येथील घरासमोर आहेत. त्यांना स्थानबद्ध केलं जात आहे. लोकशाहीला शोभा देणारी ही कारवाई नाही. कोंबड झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही. अशा प्रकराच्या कारवाईने सत्य लपवता येणार नाही. सोमय्या यांना जे करायचं आहे ते करतच राहतील, असं दरेकर यांनी सरकारला ठणकाऊन सांगितलं. तसेच अशा प्रकारचं दबावाचं राजकारण लोकशाहीला मारक असल्याचंही दरेकर म्हणाले.

Leave a Reply