सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटरी चोरणारी टोळी जेरबंद

नागपूर : १९ सप्टेंबर – नागपूर शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटरी चोरणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला असून नितीन साहू, मुकेश साहू, प्रकाश राठोड राजकुमार आणि संतोष साहू अशी आरोपींची नावे आहेत. नागपूर शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या बॅटरी काही दिवसांपासून चोरीला जात होत्या. यामुळे पोलिसांच्या कामात अडथळा येत होता.
अनेक प्रमुख चौकात या घटना घडल्यामुळे पोलीस चिंतेत होते, नितीन मुकेश संतोष आणि राजकुमार भंगार व्यावसायिक आहेत. राजकुमारचा कळमण्यात कारखाना आहे. तिथे नितीन मुकेश आणि संतोष चोरी केलेल्या बॅटरी विकत होते. बॅटरी वितळवून शिसे काढण्यात येत होते.
आरोपी पहाटे तीन ते पाच वाजताच्या दरम्यान ऑटो किंवा बाईकने बॅटरी चोरी करण्यासाठी निघत होते. सीसीटीव्ही कॅमेरा पासून बचाव करण्यासाठी ते वस्तीतून जात आणि येत होते. पहाटे पोलिसांची गस्त कमी असते यामुळे आरोपी सहज बॅटरी चोरून फरार होत होते. आरोपींकडून 62 बॅटरीचे बॉक्स 176 किलो शिसे आणि वाहनासह 3.60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शहरात 3 हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, मात्र चोरट्यांनी शहराच्या या तिसऱ्या डोळ्यावरच नजर टाकली. परंतु चोरट्यांच्या गॅंगचं हे कृत्य पुढे आलं आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली.

Leave a Reply