चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता – जयंत पाटील

मुंबई : १९ सप्टेंबर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून धुरळा उडवून दिला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं असावं, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजप सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेते काही लोक येण्याची शक्यता आहे. तशी गडबड मला दोन दिवसात दिसतेय. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असा चिमटा पाटील यांनी काढला.
हाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. हे सरकार स्थिर आहे. दोन वर्ष भाजपचे नेते असंच बोलत आहेत. त्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर होते. विशेष म्हणजे दोघेही नेते एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती.
मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सीरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते धुळ्यात बोलत होते.

Leave a Reply