साहेब मी फोडू का नारळ? – आणि जयंत पाटील यांनी जिंकली उपस्थितांची मने

सांगली : १९ सप्टेंबर – बऱ्याचदा आपल्या कृतींच्या माध्यमातून राजकीय नेते लोकांची मने जिंकत असतात. आज राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपल्या अशाच एका कृतीच्या माध्यमातून वाळवाकरांची मने जिंकली आहेत. साहेब…मी पण फोडू का नारळ? असे म्हणणाऱ्या लहानग्या संचितचे निरागस बोल ऐकून मंत्री जयंत पाटलांनी लागलीच त्याची नारळ फोडून शुभारंभ करण्याची इच्छा पूर्ण केली.
आज सकाळी वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा-दूधगाव रस्ता, बागणी-ढवळी-बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगाव दरम्यान दोन लहान पूल, नागाव-भडखंबे-बहादूरवाडी फाटा या रस्त्यांच्या विविध कामांचा शुभारंभ मंत्री पाटील यांच्या हस्त करण्यात आला.
दरम्यान, वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना ६ वर्षीय संचित गावडे हा चिमुकला त्यावेळी तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी रस्त्याच्या कामाच्या शुभारंभासाठी जमलेली पाहून लहानग्या संचितलाही याचे मोठे कुतूहल वाटले. मोठी हिम्मत करून संचितने नारळ फोडण्याची इच्छा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर पाटील यांनीही लागलीच त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नारळ त्याच्या हाती सोपवला. यामुळे उपस्थित नागरिकांनाही या गोष्टीचे कौतुक वाटले.

Leave a Reply