नवी दिल्ली : ९ सप्टेंबर – मुस्लिमांना धार्मिक आधारावर नव्हे तर अल्पसंख्याक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व दिले पाहिजे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले बुधवारी परिक्रमा मार्ग गोपाळखार येथील श्री राधाप्रसाद धाम येथे आयोजित संगीत शिरोमणी स्वामी हरिदास आविर्भाव महोत्सवात सहभागी झाले होते. कार्यक्रमात आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवीसी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. राजकीय पक्षांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याचा विचार केला पाहिजे, पण तो धर्मावर नसून अल्पसंख्याक समुदाय असण्यावर असावा असे आठवले यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटींसह उत्तर प्रदेशात उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. रामदास आठवले मंगळवारी गाझियाबादमध्ये होते. २६ तारखेपासून उत्तर प्रदेशमध्ये आरपीआय बहुजन कल्याण यात्रा काढणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. सहारनपूरपासून सुरू होणारी ही यात्रा उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे.
रामदास आठवले यांनी स्पष्ट केले की राजकीय पक्षांकडून मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याच्या प्रस्तावाला त्यांचा पाठिंबा आहे पण त्यांना हे प्रतिनिधित्व धर्माच्या आधारावर नाही तर अल्पसंख्याक समुदायाच्या आधारावर द्यायला हवं.
तालिबानशी संबंधित एका प्रश्नावर आठवले यांनी सरकारच्या धोरणाचे समर्थन केले आणि म्हणाले, “भारत सरकार सध्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यानुसार पुढील रणनीती ठरवली जाईल.”
महाराष्ट्रातील करोना विषाणूच्या स्थितीबद्दलही रामदास आठवले यांनी यावेळी भाष्य केलं. “महाराष्ट्रातील सरकार आणि सामान्य जनता करोना विषाणूविरोधात लढाई लढत आहे. संपूर्ण देशात करोना विषाणूची तिसरी लाट येऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना मोफत लस पुरवण्याचे मोठे ऐतिहासिक काम करत आहेत,” असे रामदास आठवले यांनी म्हटले.