वर्हाडी ठेचा …

नियतीशी झुंज

मार नियति तू किती तडाखे मारायाचे मार
तुझे तडाखे खाउन तुजला मीच करिन गं गार ||

मी न डरतो महामारीला
घाबरतो ना युद्धालाही
चालत राहिन विजय पथावर
करित रहा तू वार ||

किती अजुन तू देशिल चटके
किती मारिशी चाबुक फटके
म्हणेन मी ना नशीब फुटके
मानिन मी ना हार ||

तव वणव्यातून भाजुन निघता
बळकट होईन मी अलबेला
मम भाग्याचा मीच विधाता
तुला करिन मी ठार ||

कधी तुला ना येइन शरण
तुलाच मारून सरेल हे रण
समर्थ करुनी मजला उघडिन
मानव मुक्ती -द्वार ||

    कवी -- अनिल शेंडे (९८६०३०७४६२),नागपूर

Leave a Reply