ट्रक व चारचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

अमरावती : ८ सप्टेंबर – अंजनगाव – परतवाडा महामार्गावरच्या पांढरी वळणावर बुधवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ट्रक व चारचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एका महीलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्या व्यक्तीचा उपचारासाठी अमरावतीला नेत असताना मृत्यू झाला. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे. गेल्या १५ दिवासात सदर वळणावर दुसरा अपघात झाला आहे.
अंजनगांव सूर्जी येथील मेडीकल चालक, समाजसेवी, पाणी फाउंडेशनचे कार्यकर्ते, उत्कृष्ट वक्ता प्रमोद निपाणे हे अचलपूर येथील अंगणवाडी सेविकांच्या कार्यक्रमासाठी स्वतःच्या एमएच 27 बीव्ही 2012 क्रमांकाच्या चारचाकी गाडीने अचलपूर येथे जात होते. त्यांच्या सोबत सुर्जी अंजनगाव येथील अंगणवाडी सेविका ललीता चव्हाण होत्या. अंदाजे दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पांढरी येथील वळणावर परतवाडा येथून अंजनगाव सुर्जीकडे येणार्या आरएचआय-जीबी – 2602 क्रमांकाच्या ट्रकची व चारचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारला जवळपास पन्नास फुट फरफटत नेले. कारमध्ये बसलेल्या ललीता चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रमोद निपाणे यांना पांढरी येथील नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने गाडीतून बाहेर काढत अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा पांढरीसह संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस सुरु होता. अंजनगाव पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये फसलेली चारचाकी बाहेर काढून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला. 15 दिवसात एकाच ठीकाणी दुसरा अपघात झाला. या दोन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. एवढा मोठा महामार्ग बांधत असताना रस्त्यावरील अपघातासाठी कारण ठरणारे वळण प्रशासनाने काढू नये ही फार मोठी शोकांतीका, असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. संबंधित प्रशासन अजून किती अपघाताची वाट पहात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे.

Leave a Reply