मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

प्रयत्नांती परमेश्वर
  

आपल्या मनाला एक प्रश्न विचारून बघा, मी शेवटचं मोकळे कधी हसलो? आज रोजच्या आयुष्यात दैनंदिन जीवनात ‘मी शेवटचा कधी बरं मनमोकळं हसलो होतो?’ स्वतःलाच प्रश्‍न विचारून बघा. दररोजच्या कृत्रिम जगण्यात आपण किती गुरफटून गेलोय, याची जाणीव होईल. मनमोकळं राहिल्याने मन प्रसन्न होते. मन जर प्रसन्न राहिले तर एक प्रकारचं  जीवनात नव  चैतन्य संचारतं. प्रसन्नता आणि चैतन्य नुसतं आपलं जीवन सुलभ करत नाही तर आपल्या परिवाराचंही जगणं सुंदर बनवतं. प्रसन्न मन स्वर्गाची अनुभुती देणारं आहे, तर दुःखी मन म्हणजे साक्षात नरक. तरीही आपण मन मारून का जगत असतो. जबाबदारी, संकट, प्रश्न, काम, समस्या फक्त आपल्याच वाट्याला आल्यात का? अजिबात नाही.
              जीवनातील चढ-उतार दैवी महापुरुषांना, ज्ञानी संत-माहात्म्यांना चुकले नाहीत, त्यापुढे आपली काय गत. थोडक्यात सांगायचं तर, अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन हा वाळवंटातील म्रुगजळाप्रमाणे एक भ्रम आहे. त्यामुळे, अडचणींच्या ओझ्याखाली ‘मन’मारुन जगण्यापेक्षा अडचणी पेलून त्यावर मात करण्याचा ‘मना’पासून प्रयत्न करायला हवा. मनाची ताकद फार मोठी आहे. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषी-मूनी संत महात्म्यांनी जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाचे गमक मन हेच आहे. मनापासून केलेलं कोणतेही कार्य सिद्धीस जाते. त्यामुळे आपलं मन प्रसन्न असायला हवं. मनाची प्रसन्नता लढण्याची सकरात्मक शक्ती आपल्या पाठीशी उभी करते. म्हणून तर संत महात्म्यांनी मनाला आवर घालून त्याला प्रसन्न करण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे
“मन मनासि होय प्रसन्न | तेव्हां वृत्ति होय निरभिमान”
या अभंगातून संत एकनाथ महाराज आपली वृत्ती निराभिमान होण्यासाठी मनाला प्रसन्न करून घेण्याचा सल्ला दिलाय. तर, संत तुकाराम महाराजांनी “मन करारे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण” या अभंगातून मनाची प्रसन्नता आपल्या सर्व सिद्धीचे कारण असल्याचं सांगितलंय. आपलं मन हे एक दैवत आहे.. या मनो दैवताला प्रसन्न केलं तर कुठलंही कार्य सिद्दीस जाण्यास वेळ लागत नाही, म्हणून मनाला प्रसन्न करण्याचा उपदेश महाराज करतात.
               सध्याचं युग हे प्रचंड स्पर्धेचं आणि तंत्रज्ञानाचं युग. गतीची भयंकर सक्ती असलेला काळ. ‘थांबला तो संपला’ हा नियम बनवून प्रत्येकजण धावत सुटलाय. कुणाला कुणाशी बोलायलासुद्धा वेळ नाही. कानाला इअरफोन आणि हातात मोबाईल घेतलेला आजचा माणूस जगाशी कनेक्ट असेलही, मात्र आपल्या माणसांपासून तो दुरावत चालला आहे.
‘भ्रमणध्वनीचे उंच मनोरे सोभावाताली, या हृदयाची त्या हृदयाला ‘रेंज’ मिळेना..’
गझलकार प्रसेनजीत गायकवाड यांच्या या ओळीप्रमाणे संवादाच्या ‘रेंज’ पासून माणसं ‘आऊट ऑफ कव्हरेज’ होतायेत.
इतरांशी मनमोकळं बोलणं सोडा, माणसं स्वतःशी ही बोलत नाहीत. नुसती स्पर्धा आणि पैशाची हाव, यातच आपण गुरफटून गेलोय. बरं, नेमकं काय हवंय, हे तरी आपल्याला कळतंय का? कधी आपण आपल्या अपयशाने खचुन जातो, तर कधी दुसऱ्याचं यश पाहून आपल्याला मनस्ताप होतो. काय करावं? याबाबतही अनेकांचा नुसताच गोंधळ आहे. ‘टु बी ऑर नॉट टु बी’ हा प्रश्न विचारणारा हॅम्लेट प्रत्येकाच्याच मनात क्षणोक्षणी आपले नाट्य सादर करीत असतो. या ताणतणावाने ग्रासलेल्या जीवनशैलीमुळे कित्येकांचं मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली तर ठीक, नाहीतर होणाऱ्या मनस्तापामुळे अनेकजण खचून जातात. वेडावाकडा निर्णय घेतात. आज वाढलेल्या आत्महत्येच्या संख्येमागे मनस्ताप हेच प्रमुख कारण आहे. त्यामुळे हा मनस्ताप कमी करण्यासाठी आपण आपल्या मनाशी मैत्री केली पाहिजे. इतरांशी तुलना करून त्यांचा हेवा, मत्सर द्वेष करण्यापेक्षा आपण कसं जगतोय, याचं चिंतन केलं पाहिजे.
एवढंच मला म्हणायचं आहे.

पल्लवी उधोजी

Leave a Reply