येणाऱ्या दिवसात भाजपमध्ये प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील – चंद्रशेखर बावनकुळे

औरंगाबाद : १२ जानेवारी – येत्या काही दिवसात भाजपमध्ये अनेक मोठमोठे नेते येणार आहेत, महाविकास आघाडीतील नेत्यांचा पूर्ण पक्ष रिकामा होईल, शिवसेनेचे अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगाबादमध्ये केला. लातूरमधून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चेवर उत्तर देताना बावनकुळेंनी सूचक वक्तव्य केलं.
सगळे जण भाजपामध्ये येतील, यात बरीच मोठमोठी नावं आहेत, फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील असेही बावनकुळे म्हणाले.
दुसरीकडे, भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे. ‘लातूरचे प्रिन्स – अमित देशमुख हे कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांत गेलेले नाहीत. आता भाजपत येतो, अशी हवा निर्माण झालीये. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, ते पक्षात आलेलं भाजप कार्यकर्त्यांना बिलकुल रुचणार नाही’ असं म्हणत निलंगेकरांनी देशमुखांना विरोध दर्शवला आहे.
विधान परिषद निवडणुकीतून शिंदे गट नाराज असल्याचा प्रश्न नाही, मी रोज एकनाथ शिंदेंसोबत बोलतो, सगळ्यांना बोलूनच उमेदवार अंतिम होताय. धुसफूस आमच्यात नाही तर महाविकास आघाडीत आहे. नाना पटोले त्यांच्या लोकांना घेऊन नागपुरात बसले आहेत, ते भांडताय, आमच्यात पूर्ण समन्वय आहे, असा दावा बावनकुळेंनी केला.
उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद जातं की राहतं, हे निवडणूक आयोग ठरवेल, वाद आयोगात सुरु आहे, आमच्यात नाही, असंही बावनकुळे म्हणाले.
शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यायची गरज नाही, त्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबई पुरात बुडवली, त्याला भाजप बाहेर काढतंय, आम्ही विकासात्मक काम करतो. मोदी विकासासाठी येणार आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते शिवसेनेसाठी पुरेसे आहोत. त्यांच्या कडचे सगळे लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत, असा दावाही बावनकुळेंनी केला.

उद्धव ठाकरेंसोबत कुणीही राहू शकत नाही, त्यांचे आमदार त्यांच्या सोबत नाहीत, जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही ते काय प्रकाश आंबेडकर यांना सांभाळतील. प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत, त्यांना सगळं कळतं, उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्याने बदाम पिऊन मोठे झालेले नेते आहेत. उद्धजींच्या रक्तातच युती टिकवणे नाही, ते कुणाचाच सन्मान ठेऊ शकत नाही, प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
वाचाळवीर कोण हे राज्याला माहीत आहे, अजित पवार म्हणतात मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे सभागृहात बोलतात त्यांना हे शोभतं का, जनतेला खरे वाचाळवीर कोण हे माहिती आहे, संभाजीराजे धर्मवीर आहेत, मात्र अजित पवारांना ते मान्य नाही, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Leave a Reply