रणगाडाभेदी ‘हेलिना’ क्षेपणास्त्रांसह अन्य उपकरणांच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली : ११ जानेवारी – रणगाडाभेदी ‘हेलिना’ क्षेपणास्त्रांसह अन्य उपकरणांच्या खरेदीच्या चार हजार २७६ कोटी रुपयांच्या व्यवहाराला संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी परवानगी दिली. या क्षेपणास्त्रामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) लष्कराला मोठे बळ मिळणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण व्यवहार परिषदेची परिषद झाली. या परिषदेमध्ये लष्करासाठीच्या दोन आणि नौदलासाठीच्या एका व्यवहाराला मंजुरी मिळाली. यामध्ये हेलिना क्षेपणास्त्र, प्रक्षेपक आणि अन्य पूरक उपकरणांचा समावेश आहे. ही प्रणाली लढाऊ हेलिकॉप्टरवर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे, लष्कराला बळ मिळणार आहे. याशिवाय, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या हवाई संरक्षण प्रणालीही घेण्यात येणार आहे. अतिशय सुटसुटीत आणि अल्पावधीत तैनात करणाऱ्या या ‘व्हीएसएचओआरएडी’ प्रणालीमुळे क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकसित होणार आहे. ही प्रणाली जमीन आणि सागरी क्षेत्रामध्ये तैनात करता येऊ शकते. शिवालिक वर्गातील आणि भविष्यातील अत्याधुनिक युद्धनौकांवरील ब्राह्मोस लाँचर आणि नियंत्रण प्रणालीच्या खरेदीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे, नौदलाच्या मारक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.

Leave a Reply