नागपूर विमानतळावर पेस्ट स्वरूपातील ६८ लाखांचे सोने जप्त

नागपूर : ११ जानेवारी – कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून आलेल्या प्रवाशांकडून ‘पेस्ट’ स्वरुपातील 68.60 लाख रुपये किमतीचे 1.236 किलो सोने जप्त केले. विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली असून, आरोपीची चौकशी सुरु आहे.
अब्दुल रकीब (वय 25 वर्षे) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकचा, तर सध्या मीरा रोड, मुंबई येथील रहिवासी आहे. गो एअर कंपनीच्या जी 8-2601 विमानाने सकाळी 8.05 वाजता तो मुंबईहून नागपूरला आला होता.
चौकशीदरम्यान त्याच्याकडे तीन नावाचे तीन आधार कार्ड आढळून आले. “सुरुवातीला सोने विदेशातून मुंबईत आले आणि तेथून मी नागपुरात आणले. नागपुरात एका व्यक्तीकडे सुपूर्द करणार होतो. मुंबईत सोने कुणी दिले आणि नागपुरात कुणाला द्यायचे होते, यांची नावे माहित नाही,” असं आरोपीने चौकशीदरम्यान सांगितलं. केंद्रीय जीएसटी विभागाचे आयुक्त अभयकुमार म्हणाले, आरोपी नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान प्लास्टिकचे आवरण असलेले दोन पॅकेट अंतर्वस्त्रात लपवलेले आढळले. या दोन्ही पॅकेटमधील सोन्याचे एकूण वजन 1.236 किलो आहे.
त्याच्या मोबाईल फोनमध्ये सकाळी दोन कॉलची नोंद होती. एका तासानंतर त्याच्याच मोबाईलवरुन संबंधित क्रमांकावर फोन केला असता दोन्ही स्विच ऑफ होते. चौकशीनंतर त्याला विमानतळाबाहेर आणले पण त्याला भेटणारा कुणीही दिसला नाही. त्यामुळे त्याला चौकशीसाठी कस्टम कार्यालयात आणण्यात आले. तो तस्करीचा माल दुसऱ्यापर्यंत पोहोचून देणारा आहे. त्याला पहिल्यांदाच पकडण्यात आले आहे. कारवाईदरम्यान सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी मोलाची मदत केली.

Leave a Reply