जागृत हिंदू अधिक आक्रमक होणे नैसर्गिक – डॉ. मोहन भागवत

नवी दिल्ली : ११ जानेवारी – ‘‘हिंदू समाज हा गेल्या १००० वर्षांपासून युद्ध लढतो आहे. आता त्याला याची जाणीव झाल्याने तो अधिक आक्रमक होणे नैसर्गिक आहे’’, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
‘द ऑर्गनायझर’ आणि ‘पाञ्चजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या नियतकालिकांना भागवत यांनी मुलाखत दिली. ते म्हणाले, ‘‘विदेशी आक्रमणे, विदेशी प्रभाव आणि विदेशी कटांविरोधात गेल्या १००० वर्षांपासून हिंदू समाज युद्ध लढतो आहे. या लढाईत संघ हिंदू समाजाच्या पाठीशी उभा राहिला. इतरही अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली. या सर्वामुळे अखेर हिंदू समाज जागा झाला. युद्ध लढणारे आक्रमक होणे, हे नैसर्गिक आहे. आता हिंदू समाज, हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीविरोधातील हे युद्ध बाहेरच्यांशी नाही, तर आपल्यातच असलेल्या शत्रूंविरोधात आहे. आता परकीय आक्रमक नसले तरी त्यांचा प्रभाव, कारस्थाने आहेत. हे युद्ध असल्यामुळे थोडा अतिउत्साह असला तरी आक्रमक भाषा वापरणे योग्य नाही’’.
आपल्या मुलाखतीत भागवत यांनी ‘एलजीबीटीक्यू’ व्यक्तींच्या अधिकारांना संघाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. ‘त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना सामावून घेण्याचा मार्ग कोणताही गोंगाट न करता निर्माण केला. आपल्याकडे तृतीयपंथी समाज आहे. आपण त्याकडे समस्या म्हणून बघत नाही. त्यांचे स्वत:चे वेगळे देव आहेत. आता तर त्यांचे स्वत:चे महामंडलेश्वर आहेत. कुंभमेळय़ात त्यांना स्वतंत्र स्थान आहे, असे भागवत म्हणाले. समिलगी संबंधांबाबत महाभारतातील एका कथेचे उदाहरण त्यांनी दिले. तसेच आपण स्वत: प्राण्यांचे डॉक्टर आहोत. अनेक प्राण्यांमध्येही समलैंगिकतेचे गुणधर्म आढळले आहेत. हे संपूर्णत: जीवशास्त्रीय आहे, असेही भागवत म्हणाले.
भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणताही धोका नाही. त्यांना त्यांच्या रुढी पाळायच्या असतील तर ते पाळू शकतात. त्यांना आपल्या पूर्वजांच्या रुढी पुन्हा स्वीकारायच्या असतील, तर ते स्वीकारू शकतात. हा पूर्णत: त्यांचा निर्णय आहे. हिंदू समाज एवढा ताठर नाही. मात्र, त्याच वेळी मुस्लिमांनी आपणच सर्वोत्तम असल्याची हेकेखोर धारणा सोडली पाहिजे, असे भागवत म्हणाले. ‘आपण उच्च कुळातील आहोत, आपण पूर्वी या देशावर राज्य केले आहे आणि पुन्हा करू शकतो, केवळ आपला मार्ग योग्य आहे, इतर चुकीचे आहेत, आपण वेगळे आहोत आणि त्यामुळे आपण इतरांबरोबर राहू शकत नाही’ हे ग्रह त्यांनी (मुस्लिमांनी) बाजूला ठेवले पाहिजेत, असे भागवत म्हणाले.

Leave a Reply