पंजाबमधील ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार – संजय राऊत

मुंबई : १० जानेवारी – ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. तेलंगणातून महाराष्ट्रात यात्रा आली, तेव्हा शिवसेनेकडून स्वागत करण्यात आलं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यात्रेत सहभागी झाले होते. दिल्लीत खासदार प्रियंका चतुर्वेदी सामील झाल्या आहेत. त्यामुळे पंजाबमधील ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“पंजाब आणि जम्मू-काश्मीर ही दोन राज्य देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्वाची आहेत. राहुल गांधी आपल्या यात्रेचा शेवटचा टप्पा या राज्यातून जाणार आहे. त्यानंतर ते श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवतील. हा राजकीय कार्यक्रम नाही आहे. हजारो तरुण, महिला माजी लष्कर प्रमुख सुद्धा यात्रेत सहभागी झाले आहेत. राहुल गांधी एका तपस्वी व्यक्तीप्रमाणे प्रवास करत असल्याचं लोकांची भावना आहे. त्या भावनेला तडा देण्याचं काम काही लोकं करत आहेत. कपडे, चपलांवरून वाद निर्माण करणारे देशात द्वेष पसरवत आहेत. त्यापार्श्वभूमीवरच राहुल गांधी प्रेमाचा संदेश घेऊन श्रीनगरपर्यंत निघाले आहेत,” असं संजय राऊतांनी म्हटलं.
केंद्र सरकारने यात्रेचा धसका घेतला का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “सत्ताधाऱ्यांनी धसका घ्यावा अशीच महायात्रा आहे. राजकीय फायदे तोटे पाहत नाही. पण, राहुल गांधींचे नेतृत्व यात्रेमुळे उजळून निघालं आहे. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उजाळा मिळाला आहे. त्याचा फायदा देशातील लोकशाहीला मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. राहुल गांधींनी यात्रा यशस्वी करून दाखवली,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

Leave a Reply