2023 – नंदकुमार वडेर

“.. अगं काय पाहते आहेस ? असं वर आकाशाकडे निरखून निरखून. काय ते सांगशील का आम्हाला? कळू दे कि आम्हालाही जरा! “
“अहो जरा थांबा वो! आता थोड्याच वेळात ह्या 2022 सरत्या वर्षाला निरोप दिला जाईल आणि येणारे नवे 2023च्या वर्षाचं आगमन होईल. त्याचं सुस्वागतम सोहळा हा इथं आकाशात दिसणार आहे. तोच मला बघायचा आहे.. त्यासाठी तर मी टक लावून त्याच्या कडे पाहत बसले आहे. तेव्हढं जरा पाहते नि मग तुमच्याकडे बघते.. उगाच मला डिस्टर्ब करू नका हं मधे मधे आधीच सांगून ठेवते. “
” त्याने असा काय फरक पडणार आहे तुझ्या जीवनात?. जुने गेले नि नवे आले. काही चमत्कार घडणार आहे का?. कालपर्यंत तुला तुझ्या खाण्यापिण्याची सोय करण्यात यातायात करावी लागत होती ती काय समोरच्या गोडबोले काकू आयतं तुला ताटावर नि पाटावर देणार आहेत का? उंदीर तर झडप घालून पकडावे लागत असत ते का स्वताहून तुला माऊ मला आता खा बरं म्हणणार आहेत? नाही ना? हं आता फक्त आयुष्य आपलं एक वर्षाने कमी झालं हेच ते काय खरं! मग तसे काही नसताना नववर्षाच्या आगमनाची इतकी का आतुरता लागलीय तुला? त्या लबाड, स्वार्थी माणसांच्या घरचं खाऊन त्यांच्या सारखे आचार विचार तुला सुचू लागेत असा संशय येतोय आम्हाला. . “
” अहो तुम्ही जरा गप्प बसा हो.. त्या गोडबोले काकूंच्या घरात नववर्षाच्या आगमनासाठी किती दंगा धुडगूस घालणं चालयं ते बघायला खूप गंमत वाटते मला. असं वाटतं गेले वर्षभर तर तेच करत आले असताना आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील तोच दंगा धुडगूस पुढे चालू ठेवणार असं दिसतयं.. एक संपलं म्हणून खंत नाही काय मिळालं आणि काय मिळायचं राहिलं याचा हिशोब नाही.. नव्या वर्षात संकल्पाचा पोकळ नारा द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी विसरून जायचा.. पुन्हा आपले ते आहेच जूने येरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या… मी वाट बघतेय संधीची स्वयंपाक घरात कधी शिरता येईल त्याची आणि ते तळलेले भाजलेले सुरमई पापलेट चे तुकडे कसे पळवता येतील , दुधाच्या पातेल्यात तोंड कसं घालता येईल त्याची.. आज काकु बऱ्याच हवेत तरंगताना दिसतात.. बेसावध क्षणी मी चोर पावलाने आत शिरेन.. आणि तुमच्या साठी मेजवानी आणेन.. मग आपणही करु नव वर्षाचे जंगी स्वागत.
.आहे काय नि नाय काय!
आला क्षण गेला क्षण ..
घे आनंद आज आता या क्षणाचा. .
कुणी सांगितलाय भरवंसा उद्याचा..

नंदकुमार वडेर ,सांगली.

Leave a Reply