सूरमनी पं. प्रभाकर धाकडे यांचे निधन

नागपूर : ८ जानेवारी – ज्येष्ठ व्हायोलिन वादक, संगीतकार सूरमनी पं. प्रभाकर धाकडे यांचे शनिवारी सायंकाळी एका खाजगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्याच्या पश्चात पत्नी उर्मिला, मंगेश, कौशिक आणि विशाल ही तीन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. आज
सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते त्यामुळे त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. २५ ऑक्टोबरला १९४९ मध्ये आरमोरी येथे जन्मलेले प्रभाकराव धाकडे यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी अपघाताने कायम अंधत्व आले. त्यामुळे वडिलांनी त्यांना माता कचेरी येथील अंध विद्यालयात दाखल केले होते. प्रभाकररावांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता.
अंध विद्यालयात त्यांनी बननराव कान्हेरकर, पाठकमास्तर, केशवराव ठोंबरे यांच्याकडून व्हायोलिन तर पिट्टलवार यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेतले होते. शिक्षण झाल्यानंतर १९६७ मध्ये एससीएस गर्ल्स हायस्कूल येथे संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली. वडिलांच्या निधनानंतर उत्तर नागपुरातील इंदोरा परिसरातील वडिलांनी सुरू केलेल्या भास्कर संगीत विद्यालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ते आकाशवाणीचे अ श्रेणीचे कलावंत होते. जपानला झालेल्या आंतरराष्ट्रीय संगीत समारोहात त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
त्यांना मुंबईच्या सूरसिंगार संगीत संस्थेतर्फे सुरमणी ही पदवी बहाल करण्यात आली होती. रवींद्र साठे, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आदी कलावंतांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीते सादर केली. गेल्या महिन्यात झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात त्यांचे व्हायोलिन वादन झाले आणि तोच त्यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला.

Leave a Reply