इतिहास आणि राजकारण – मधुसूदन (मदन) पुराणिक

आजच्या राजकारणात इतिहासातील घटना, व्यक्तिमत्वे आणि त्यांचं कर्तृत्व ह्याविषयी विनाकारण चर्चा आणि अपमानास्पद वादविवाद सुरु आहे. आमच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या जातीवर, त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा, वाद किंवा टिका करणाऱ्या सामान्य बुद्धीच्या महाभागांचा इतिहासाचा अभ्यास किती, त्यांच्या मनांत आणि हृदयांत आमच्या इतिहासातील महात्म्याबद्दल आदर किती आणि त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव किती ह्याबद्दल शंका यावी अशाप्रकारची वक्तव्ये जाहीरपणे करताना दिसतात. राजकारणातील अशांचे स्थान बघीतले की त्यांना मोठं करणाऱ्या सामान्य जनतेचं नक्कीच चुकलं असं त्यांना वाटतं असणार.

महापुरुष, संत, महात्मे, राष्ट्रपुरुष, राष्ट्रभक्त, शहीद ह्यांची जात ही त्यांच्या कर्तृत्वाच्या आड ना कधी आली ना त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांनी त्यांच्या जातीकडे बघून त्यांची पूजा केली. ज्यांच्या बलिदानांनी आमच्यासारख्या सामान्य माणसांना स्वातंत्र्यातील सुखाचा घास मिळवून दिला, ज्यांनी आमच्यावर योग्य संस्कार व्हावेत म्हणून आपल्या सुखाला तिलांजली देऊन सामान्यांचे घर ज्ञानप्रकाशाने उजळून टाकण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांना खरे आणि खोटे, वाद आणि विवाद, मतं आणि मतातरं, जाती आणि वर्ण, धर्म आणि राजकारण वगैरेंच्या बंधनात अडकवून आपली राजकारणाची पोळी भाजून आपली पोटं भरण्यासाठी त्यांचा सतत किती अपमान करणार आहात?

वाईट याचं वाटतं की अशा महाभागांच्या बेताल वक्तव्यांचं कौतुक स्वत:ला ज्येष्ठ म्हणवून घेणारेही त्याच पातळीवर येऊन करतात आणि आमची इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमें अशा वक्तव्यांना प्रसिद्धी देण्यासाठी, आपले टि.आर.पी. वाढविण्यासाठी सरसावत असतात. देवदेवतांच्या, संतमहात्म्यांच्या, देशभक्तांच्या, शहिदांच्या इतिहासाबद्दल परकीयांनी लिहीलेल्या लेखांवर ह्यांचा विश्वास परंतु आमच्या इतिहासकारांच्या अभ्यासपूर्ण लेखांवर अविश्वास दाखवत जे धादांत चूक आहे तेच किती बरोबर आहे हे सांगण्यासाठी यांची अहमहमिका सुरु असते. एकदा अशा वाचाळांच्या मुखातून चुकीची वक्तव्ये आणि आमच्या श्रद्धास्थानांबद्दल गचाळ शब्द बाहेर पडलेत की ह्यांना आपोआपच प्रसिद्धी प्राप्त होते आणि समजा त्यांच्या चुकीच्या वक्तव्यावर नाराज होत त्यांच्या विरुद्ध बहुसंख्येने उठाव झालाच तर माध्यमांवर काही सेकंदाची शाब्दिक दिलगीरी व्यक्त करीत हे महाभाग आपली सुटका करून घेतात आणि आम्ही मूर्खही क्षणांत त्यांच्या घाणेरड्या वक्तव्यांना विसरूनही जातो, अशांना माफही करून टाकतो.

मित्रहो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, अशा बेताल मुखांना वेसन घातलीच पाहिजे. अशा महाभागांना त्यांची जागा दाखवायची असेल तर आपल्यातील प्रत्येक श्रद्धावान देशभक्त जागा झाला पाहिजे. आपली लढाई अशा कमकुवत विचारांशी आहे हे समजून घेत अशा नेत्यांना, महाभागांना आपल्या सहिष्णू स्वभावाचा त्याग करीत आपल्या मतशक्तिच्या आणि मतशस्त्रांच्या जोरावर तडीपार केलं पाहिजे, त्यांना आमच्या राष्ट्रात किंमतच उरलेली नाही हे दाखवून दिले पाहिजे.

ज्यावेळी ही पाताळयंत्री वळवळ्यांची पिलावळ नष्ट होईल आणि आपल्या नव्या पिढीला आपल्या देवदेवतांचा, संतमहात्म्यांचा, राष्ट्राचा, राष्ट्रपुरुषांच्या, राष्ट्रभक्तांचा, शहिदांच्या त्यांच्या कर्तृत्वाचा खरा इतिहास माहीत होईल ना त्या दिवसापासूनच अशा राजकारण्यांची किंमत उणे होत जाईल, ह्या राष्ट्राचा नवोदय सुरु होईल आणि आपल्या राष्ट्राला चैतन्यमय गतीशीलताही प्राप्त होईल.

वन्दे मातरम्

मधुसूदन (मदन) पुराणिक

Leave a Reply