संपादकीय संवाद – गैरमुद्द्यांचे राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर विचार करा

महापुरुषांबद्दल बोलतांना प्रत्येकाने काळजी घेऊनच बोलायला हवे, अशी सूचना छत्रपती शाहू महाराज यांनी केली आहे. त्याचबरोबर लोकशाहीत प्रत्येकाला मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे, आणि अश्यावेळी कुणी आपल्याला न पाटणारेही मत व्यक्त केले तरी सासमाजिक भान ठेवत अश्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करायला हवे असेही त्यांनी सुचवले आहे.
सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या विविध वादांच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींचे हे प्रस्ताव स्वागतार्हच म्हणायला हवेत. मुळात अश्या मुद्द्यांवरून वादच व्हायला नको, हे मुद्दे नसून गैरमुद्दे म्हणायला हवेत. आणि गैरमुद्द्यांचे राजकारण करणे हे पूर्णतः चुकीचेच म्हणावे लागेल. असे असले तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात सध्या मुद्दे सोडून गैरमुद्द्यांवरच राजकरण सुरु झाले आहे.
याची सुरुवात झाली ती राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असतांना या यात्रेत त्यांनी सावरकरांवर टीका केली. त्यांची टीका ही अनुचितच होती. त्यामुळे बहुसंख्य मराठी माणूस दुखावणे साहजिक होते. त्यावरून वाद सुरु झाले. मग हा मुद्दा बाजूला टाळण्यासाठी राजयापालांच्या तोंडी आलेल्या वक्तव्यावरून अकारण राजकारण केले गेले. त्यात मंगलप्रसाद लोढा आणि प्रसाद लाड यांचीही वक्तव्य आणली गेली. असे टप्प्याटप्प्याने जात आता अजितदादांचे संभाजी महाराजांवरचे वक्तव्य प्रचंड चर्चेत आहे.
इथे प्रश्न असा निर्माण होतो, की यातून सध्या काय होणार. राज्यासमोर आज अनेक प्रश्न आहेत, राजकारणी मंडळींनी त्या प्रश्नांवर चर्चा करून असे प्रश्न सोडवून जनसामान्यांना दिलासा कसा देता येईल? याचा विचार करायला हवा. मात्र असे न करता सर्वच राजकारणी गैरमुद्द्यांचे राजकारण करण्यातच आपला वेळ घालवत आहेत.
यामुळे राजकीय पक्षांना एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी जरूर मिळेल मात्र त्यातून जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होणार नाही हे नक्की. अश्या परिस्थितीत जनसामान्यांचा राजकारणी मंडळींवरचा विश्वास उडू शकतो, असा विश्वास उडाला तर भविष्यात महाराष्ट्रात अर्जकाजकाची स्थिती निर्माण होईल, हा धोका सर्वांनीच लक्षात घ्यायला हवा.

अविनाश पाठक

Leave a Reply