आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा – सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू

अमरावती : ५ जानेवारी – वरुड-मोर्शी मतदार संघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी वरुडमध्ये कालपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू झालं आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांचं वाहन जाळण्यात आल्याची तक्रार देण्यात आली होती. मात्र पोलीसांना दोन वर्षात याप्रकरणी काहीच पुरावे मिळाले नाही. त्यामुळे अखेर हे प्रकरण कायमस्वरूपी तपासात ठेऊन क्लोझर रिपोर्ट सादर केला. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता बाहेर आली पाहिजे त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आता यात काय समोर येईल याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष लागले आहे.
2019 च्या विधानसभा प्रचार दरम्यान 19 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 5.30 वाजता उमेदवार असलेले देवेंद्र भुयार यांच्यावर अज्ञातांनी देवेंद्र भुयार यांच्या दिशेने गोळीबार केला. तसेच वाहन पेटवून दिले, अशी तक्रार देवेंद्र भुयार यांचा चालक आकाश नागापुरे यांनी शेंदूरजना घाट पोलिसात दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला पण अज्ञात 6 जण आणि वाहनाचा शोध लागला नाही. अखेर 10 डिसेंबर 2020 रोजी पोलिसांनी हे प्रकरण कायमस्वरूपी तपासात ठेवून क्लोझर रिपोर्ट दिला.
या सगळ्या प्रकारावर आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं की, माझ्या विरोधात सुरु असलेले उपोषण हे माझ्या हिताचेच आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती ठणठणीत राहावी हीच सदिच्छा. वाहन जाळपोळ आणि गोळीबारीचे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे, त्यामुळे मला त्यावर जास्त बोलता येणार नाही. एकदा न्यायालयाचा निकाल आला त्यानंतर मी सविस्तर माहिती देईल, असं आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. तसंच याप्रकरणाची एसआयटी (SIT), सीबीआय (CBI), ईडी (ED) जे जे करता येईल ते केलंच पाहिजे त्यात काही दुमत नाही. पण उपोषणकर्त्यांना कुठलेही उत्तरं मी देणार नाही, ते माझ्या हितासाठी बसले आहेत, असेही भुयार म्हणाले.
आता नेमकं ते वाहन जाळलं कोणी आणि गोळ्या खरच झाडल्या होत्या का? हा मुद्दा घेऊन वरुडमधील सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक झाले आहेl. त्यांनी आरोप केला आहे की, ज्यावेळी वाहन जळालं तेव्हा वाहनात देवेंद्र भुयार आणि त्यांचे चार कार्यकर्तेच होते. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करून सत्य बाहेर यावे, ही मागणी घेऊन उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणामुळे देवेंद्र भुयार हे आमदार म्हणून निवडून आले असल्याचाही आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यामुळे आता यावर पोलिसांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. यातून काय समोर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply