अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : ५ जानेवारी – अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे स्नेहभोजनाचे आयोजन केलं होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. या मागणीला योगी आदित्यनाथ यांनी तत्वतः मंजुरी दिली.
तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याचेही योगी आदित्यनाथ यांना सांगितलं. त्यावर समाधान व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने अयोध्या भेटीचं आमंत्रणही एकनाथ शिंदेंना योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, खासदार रवी किशन हेदेखील उपस्थित होते.

Leave a Reply