शहरातील १० हजार वीज कामगार संपावर

नागपूर : ४ जानेवारी – खासगीकरणाला विरोध म्हणून महावितरण, महापारेण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील कर्मचारी आज, मंगळवारला मध्यरात्री १२ च्या ठोक्यापासून राज्यभरातील वीज कामगार संपावर गेले आहेत.
कामगारांच्या सर्वच संघटनांनी सहभाग नोंदविल्याने १०० टक्के कर्मचारी संपावर असल्याचा दावा करण्यात आला. यामुळे वीज यंत्रणा रामभरोसे असून राज्य अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपुरातील तिन्ही कंपन्यांचे सुमारे १० हजार कर्मचारी संपावर गेल्याचा दावा केला जात आहे.
अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे वीज वितरणाच्या परवान्याची मागणी केली आहे. याविरोधात वीज कर्मचारी ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. पूर्वी ३० संघटनांनी संपात सहभागाची तयारी चालविली होती. प्रत्यक्षात मात्र सर्वच संघटना सहभागी झाल्या असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
आउटसोर्सींगचेही कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करून कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले. असहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. तरीही कर्मचारी संपावर गेले आहेत. आता कोणत्याही स्थितीत माघार नाही, अशा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

Leave a Reply