वीज कर्मचाऱ्यांच्या संपणे चंद्रपुरात वीजनिर्मिती ठप्प

चंद्रपूर : ४ जानेवारी – राज्यभरातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवार मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. याचा परिणाम महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. याद्वारे महावितरण कंपनी अदानी समूहाला विकली जाणार असल्याच्या समजुतीतून हा संप पुकारण्यात आला आहे.
महावितरण विभागाचे खासगीकरण करू नये यासाठी महावितरण कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहे. चंद्रपूर जिल्हातील ८५०० विज कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाला महावितरण, महापारेशन आणि महाजनकोच्या कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. जिल्हात महापारेशन ३००, महावितरणचे १९०० तर महाजनकोचे ६३५० कर्मचारी कार्यरत आहेत. या संप काळात अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी महावितरणाने पूर्ण तयारी केली आहे.
महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला नष्ट करण्यासाठी अदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवानगीसाठी अर्ज केला आहे. सरकारने मंजुरी दिल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होणार आहे. वीज वितरण कंपनी फायद्यात असताना ती तोट्यात जाऊन बंद पडू शकते, असा आरोप वीज कर्मचाऱ्यांनी केला.
३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून महावितरण, महापारेशन आणि महाजनकोच्या कर्मचारी संघटना संपावर गेल्या आहेत. अदानी इलेक्ट्रिक कंपनी समांतर वीजपुरवठा करू लागली तर ज्या पद्धतीने शासकीय दूरसंचार विभाग नष्ट झाला तीच वेळ महावितरणवर येऊ शकते, असा आरोपही संघटनांनी केला आहे. असे होऊ नये यासाठी व्यवस्थापनाशी २ जानेवारी २०२३ रोजी ऊर्जा सचिव व तीनही कंपनीच्या व्यवस्थापक आणि सर्व संघटना प्रतिनिधी यांची बोलणी फिसकटल्याने महाराष्ट्र राज्य कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती व वीज कर्मचारी संयुक्त कृती समिती ऊर्जानगरच्या वतीने द्वारसभा घेण्यात आली होती.

Leave a Reply