बलात्काराच्या खोट्या प्रकरणात दोन वर्ष तुरुंगात, शासनाकडे मागितली १०००६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई

भोपाळ : ४ जानेवारी – मध्य प्रदेशातील रतलाममध्ये एका व्यक्तीला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात तब्बल दोन वर्षे तुरुंगात राहावं लागलं. 666 दिवस तुरुंगात घालवून बाहेर आलेल्या व्यक्तीने आता सरकारकडे 10006 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यामध्ये व्यवसायाच्या नुकसानापासून ते खटल्यापर्यंतच्या खर्चाचा समावेश होतो. विशेष बाब म्हणजे मागणी केलेल्या एकूण रकमेपैकी त्याला 10,000 कोटी रुपये यासाठी हवे आहेत कारण त्याला या काळात ‘देवाने मानवाला दिलेल्या देणग्या, जसं की शारीरिक संबंधापासून’पासून वंचित राहावं लागलं.
35 वर्षीय कांतीलाल भीलचं म्हणणं आहे, की आरोप आणि तुरुंगामुळे त्याचं जगच पूर्णपणे बदलून टाकलं. त्याची पत्नी, मुलं आणि आई यांना खूप त्रास सहन करावा लागला. टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना तो म्हणाला, “त्या दोन वर्षांच्या तुरुंगवासात मला काय त्रास सहन करावा लागला हे मी सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबाला इनरवेअरही खरेदी करता आले नाही. तुरुंगात मी कपड्यांशिवाय प्रचंड थंडी आणि उष्णतेचा सामना केला.
कांतीने पुढं सांगितलं, की की भगवतीच्या कृपेने तो तुरुंगातून बाहेर पडू शकला कारण वकिलाने कोणतीही फी न घेता केस लढवली. आता त्याला तुरुंगात घालवलेल्या प्रत्येक दिवसाचा हिशोब हवा आहे. नुकसान भरपाईच्या याचिकेत त्याने पोलिसांवर ‘खोटे, बनावट आणि बदनामीकारक विधाने केल्याचा आरोप केला आहे आणि खोट्या आरोपामुळे आपलं आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं आहे. कांतीलाल म्हणाला की, कारागृहात त्वचेच्या आजाराशिवाय इतरही काही आजार झाले. कुटुंबातील तो एकमेव कमावता सदस्य असल्याचंही त्यानं सांगितलं.
कांतीलाल यांनी व्यवसायाचं नुकसान, प्रतिष्ठेला तडा, शारीरिक आणि मानसिक त्रास, कुटुंबाचे नुकसान यासाठी 1-1 कोटी रुपयांची मागणी केली आहे. याशिवाय सेक्सचा आनंद घेऊ न शकल्यामुळे त्याला 10 हजार कोटी रुपये हवे आहेत. कांतीलालने तुरुंगात असताना खटल्यासाठी झालेल्या खर्चासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली आहे.
कांतीलालचे वकील विजय सिंह यादव यांनी सांगितलं की, जिल्हा न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीसाठी १० जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. गँगरेप प्रकरणात कांतीलालला आरोपी बनवण्यात आलं होतं. 18 जानेवारी 2018 रोजी एका महिलेनं तक्रार दाखल केली की, ती तिच्या भावाच्या घरी जात होती आणि वाटेत कांतीलालने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवर बसवलं. त्याने तिला जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी कांतीलालला अटक करून तुरुंगात पाठवलं, मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply